मुंबई: उद्धव ठाकरे हे वैफल्यग्रस्त आणि निराश मनस्थितीत आहेत. त्यांना बुद्धीभ्रंश झाला आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांची वैद्यकीय चाचणी करण्याची गरज आहे, असे वक्तव्य भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ते शुक्रवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी भाषेत टीका करताना त्यांचा एकेरी उल्लेख केला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हा सत्तेसाठी पिसाळलेला नेता आहे, असे बावनकुळे यांनी म्हटले. त्यामुळे आता ठाकरे गटाकडून बावनकुळेंच्या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, हे आता पाहावे लागेल.
उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा औरंगजेब म्हणून उल्लेख करतात. महाराष्ट्र आणि देशातील जनता ही गोष्ट खपवून घेणार नाही. किंबहुना औरंगजेबी वृत्ती असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वत:च्या भावाला सर्वप्रथम घराबाहेर काढले. त्यांनीच राज ठाकरे यांना दूर केले. सख्ख्या भावासारख्या देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले.त्यामुळे उद्धव ठाकरे यांचीच वृत्ती औरंगजेबासारखी आहे. सत्तेसाठी पिसाळलेले उद्धव ठाकरे आता मोदींना औरंगजेब म्हणत आहेत. उद्धव ठाकरे 22 जानेवारीची तारीख विसरले का? पण 4 जून येऊ द्या, मग तुम्हाला दिसेल. 2024 ची लोकसभा निवडणूक उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यातील सर्वात वाईट निवडणूक असेल, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि राऊतांकडून मोदींना सातत्याने औरंगजेबाची उपमा
गेल्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांच्यावर थेट हल्ला केला जात आहे. या दोन्ही नेत्यांकडून पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख औरंगजेब असा केला जात आहे. ही गोष्ट भाजप नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. पंतप्रधान मोदी यांची वृत्ती औरंगजेबाची नाही, असे का म्हणायचे नाही? औरंगजेबाने मराठ्यांबाबत लिहून ठेवलं होतं. डोंगरदऱ्यांमध्ये राहणारे मरहट्टे तमाम दुनियेला भारी आहेत. वीरांचा शूरांचा हा इलाखा आहे. पहाडी मुलखात तमाम दुनियेला ते भारी आहेत. इथे पराक्रम शिकवावा लागत नाही. आज औरंगजेबाची वृत्ती शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडत आहे. तोडा-फोडा आणि राज्य करा. आम्ही भाजपला सोडलं हिंदूत्व सोडलं नाही. दुसऱ्या धर्माचा द्वेष करणे हे छत्रपतींनी शिकवलं नाही. महाराष्ट्र लुटायचा प्रयत्न कराल, तर औरंगजेब वृत्तीला मुठमाती दिल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील सभेत म्हटले होते.
आणखी वाचा
"मोदी नाही, औरंगजेब म्हणा", संजय राऊतांच्या टीकेला मोदींचं चोख प्रत्युतर; म्हणाले...