मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 99 उमेदवारींची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, यामध्ये सर्वांना उत्सुकता असलेल्या जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातील (Jogeshwari East constituency) उमेदवाराच्या नावाचा समावेश नव्हता. त्यामुळे या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार, यासाठी आणखी काही वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे सिटिंग गेटिंग फॉर्म्युलानुसार हा मतदारसंघ शिंदे गटाच्या वाट्याला जाणार, असे दिसत आहे. रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांचा बालेकिल्ला असणाऱ्या जोगेश्वरी पूर्वची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. रवींद्र वायकर खासदार झाल्याने शिंदे गटाकडून यंदा या मतदारसंघात त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात रवींद्र वायकर यांचे शिष्य आणि जवळचा कार्यकर्ता असलेल्या अनंत नर यांना ठाकरे गट रिंगणात उतरवेल अशी चर्चा आहे. त्यामुळे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात गुरु शिष्यात सामना होण्याची शक्यता आहे.


लोकसभा निवडणुकीत जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांना भरभरुन मते मिळाली होती. मात्र, त्यांचा अवघ्या 48 मतांनी निसटता पराभव झाला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांनाही रिंगणात उतरवली, अशी चर्चा आहे. 


मुंबईतील भाजपचे तीन आमदार गॅसवर


भाजपने रविवारी विधानसभा निवडणुकीसाठीच्या 99 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली. यामध्ये 13 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देत भाजपने सेफ गेम खेळणे पसंत केले. तर मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांच्या रुपाने एकमेव नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. भाजप नेतृ्त्व मुंबईत भाकरी फिरवून नव्या चेहऱ्यांना संधी देणार, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, तसे काहीही घडले नाही. त्यामुळे बहुतांश विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळाली. परंतु, या सगळ्यात अद्याप भाजपच्या तीन उमेदवारांचे टेन्शन कायम आहे.


भाजपच्या पहिल्या यादीत सुनील राणे (बोरिवली),  भारती लव्हेकर (वर्सोवा) आणि पराग शहा (घाटकोपर पूर्व) या तीन विद्यमान उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. खराब कामगिरीमुळे आणि अन्य नेत्यांचे पुनर्वसन करायचे असल्याने या नेत्यांचा पत्ता कट होईल, अशी चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबईतून पीयूष गोयल यांच्यासाठी गोपाळ शेट्टी यांना उमेदवारीवर पाणी सोडावे लागले होते. त्यामुळे आता त्यांना बोरिवली मतदारसंघातून संधी देण्यात येईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे विद्यमान आमदार सुनील राणे यांचा पत्ता कट होईल, असे सांगितले जात आहे. 


पराग शहा आणि भारती लव्हेकरांची धाकधूक वाढली


राज्यातील सर्वात श्रीमंत आमदार असलेले घाटकोपर पूर्व विधानसभेचे लोकप्रतिनिधी पराग शहा यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार आहे. भाजपचे माजी मंत्री प्रकाश मेहता यांनी पराग शहा यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. शहा यांना उमेदवारी दिल्यास आपण वेगळा निर्णय घेऊ, असा इशारा प्रकाश मेहता यांनी दिला होता. त्यामुळे या मतदारसंघातून प्रकाश मेहता यांनाच संधी मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे भारती लव्हेकर यांच्याऐवजी संजय पाण्डेय यांना वर्सोवा मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकते.


आणखी वाचा


10 वर्षे मतदारसंघ बांधला, 2019 मध्ये संधी हुकली; मालाड पश्चिममधून उमेदवारी मिळालेले कोण आहे विनोद शेलार?