पाटणा : देशाचं लक्ष लागलेल्या बिहार विधानसभेच्या (Bihar vidhansabha) निवडणुकांच्या 243 जागांसाठी अखेर मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपन्न झालं. सायंकाळी 6 वाजेपर्यंत बिहारच्या दुसऱ्या टप्प्यात आज 67 टक्के एवढं मतदान झाल्याची माहिती आहे. 6 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यात 65 टक्के मतदान झाले होते, त्यामुळे बिहारची जनता यंदा मतदानासाठी बाहेर पडल्याचं दिसून येत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान संपताच एक्झिट पोल समोर आले असून बिहारमध्ये पुन्हा नितीश कुमार (Nitish kumar) यांच्या नेतृत्वातच सरकार बनणार असल्याचं पाहायला मिळत आहे. एनडीए आघाडीला स्पष्ट बहुमत मिळत असून नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (JDU) पक्षालाही मोठं यश मिळताना दिसत आहे. दरम्यान, बिहार निवडणुकीसाठी 14 नोव्हेंबर रोजी खरा निकाल जाहीर होईल.
बिहार विधानसभा निवडणुकांसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपन्न झाल्यानंतर एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली असून भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं दिसून येत आहे. बिहारमधील 243 जागांसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपताच एक्झिट पोलमधून बिहारमध्ये कोणाचं सरकार बनणार, बिहारची जनता कोणाला कौल देणार, बिहार निवडणुकीत नव्याने उदयास आलेल्या प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला किती जागा जिंकता येणार, या सर्वांचा अंदाजे कौल समोर आला आहे. त्यानुसार, बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजप-जदयू एनडीए आघाडीला स्पष्ट बहुमत मिळत आहे.
नितीश कुमार यांच्या 20 ते 25 जागा वाढणार
बिहार विधानसभा निवडणुकीत गत 2020 मध्ये नितीश कुमार यांच्या जदयु पक्षाने केवळ 43 जागांवर विजय मिळवला होता, तर भाजपला 74 जागा जिंकता आल्या होत्या. मात्र, यंदा 2025 च्या निवडणुकीत Matrize-IANS एक्झिट पोलनुसार जदयूला 65 ते 75 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. म्हणजेच गत निवडणुकीपेक्षा 20 ते 30 जागा अधिक जिंकण्याचा अंदाज आहे. चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार नितीश कुमार यांच्या पक्षाला 52 ते 57 जागा मिळू शकतात. म्हणजेच, गत निवडणुकीपेक्षा 10 ते 15 जागा अधिक आहेत. त्यामुळे, नितीश कुमारांचे पारडे जड असल्याचं पाहायला मिळत आहे. Matrize-IANS एक्झिट पोलनुसार भाजपला 65 ते 73 जागांवर विजय मिळू शकतो. तर, चाणक्यच्या आकडेवारीनुसार भाजपला 70 से 75 जागा जिंकता येतील, असा अंदाज आहे. दरम्यान, गत 2020 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 74 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे, यंदाच्या निवडणुकीत एक्झिट पोलनुसार नितीश कुमार यांचीच हवा असल्याचं दिसून येत आहे.
प्रशांत किशोर यांचा सुपडा साफ
बिहार निवडणुकांसाठी घेण्यात आलेल्या बहुतांश एक्झिट पोलमधून एनडीए आघाडीला बहुमत मिळत असल्याचं स्पष्ट होत आहे. तर, प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला बिहारच्या जनतेनं नाकारल्याचं स्पष्ट होत आहे. बिहार निवडणुकीसाठी MATRIZE-IANS च्या एक्झिट पोलनुसार, NDA ला 48 टक्के, महाआघाडीला 37 टक्के आणि इतरांना 15 टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएची सत्ता येणार हे स्पष्ट झालं आहे.
बिहार निवडणूक विविध संस्थांचे एक्झिट पोल सर्वेक्षण
आयएएनएस-मॅटराइजच्या एक्झिट पोलनुसार एनडीए आघाडीला 147-167 जागांवर विजय मिळू शकतो, तर राजद-काँग्रेस महाआघाडी केवळ 70-90 जागांवर यश मिळेल असा अंदाज आहे.
CHANAKAYA STRATEGIES च्या अनुसार एनडीए आघाडीला 130-138 जागा जिंकता येतील, तर काँग्रेस महाआघाडीला 100-108 जागांवर विजय मिळेल. इतर पक्ष 3 ते 5 जागांवर यश मिळवतील. त्यामुळे, प्रशांत किशोर यांच्या पक्षाला यश मिळणार नसल्याचं दिसून येत आहे.
POLSTRAT च्या एक्झिट पोलनुसार एनडीए आघाडीला 133-148 जागांवर विजय मिळेल, महाआघाडीा 87-102 जागा जिंकता येतील आणि इतर पक्षांना 3 ते 5 जागांवर समाधान मानाने लागेल.
Poll Dairy च्या एक्झिट पोलनुसार एनडीए एनडीए आघाडीला तब्बल 184 ते 209 जागांवर विजय मिळणार असा अंदाज आहे, तर काँग्रेस महाआघाडीला 32 ते 49 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. इतर मध्ये केवळ 1 ते 5 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज आहे.
Praja Poll Analytics च्या सर्व्हेनुसार एनडीए आघाडीला 186 जागांवर विजय मिळेल असा अंदाज आहे, तर महाआघाडीला 50 जागा जिंकता येतील असे दिसून येते. याशिवाय इतर पक्षांना 7 जागांवर समाधान मानावे लागेल.
TIF Research एक्झिट पोलनुसार एनडीए आघाडीला 145-163 जागा जिंकता येतील, तर महाआघाडीला 76 ते 95 जागांवर विजय मिळेल, असे दिसून येते. इतर पक्षांना फक्त 0 ते 1 जागा जिंकता येईल, असा सर्व्हेचा अंदाज आहे.