Maharashtra Vidhansabha Election 2024: शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर एच एन रिलायन्स रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांची एच एन रिलायन्स रुग्णालयामध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांची तपासणी डॉक्टरांकडून करण्यात आली होती. या तपासणी दरम्यान ब्लॉकेज आढळून आल्यानंतर अँजिओग्राफीनंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँजिओप्लास्टी झाल्याचं सांगण्यात आले. यापूर्वी, उद्धव ठाकरे यांच्यावर 2012 मध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. दरम्यान, नुकतेच आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल देखील राज्यात वाजले आहे. मात्र उध्दव ठाकरे आजारी पडल्याचे टायमिंग साधत निवडणुका जाहीर केल्या असल्याचा संशय ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी व्यक्त करत याबाबत शंका उपस्थित केली आहे.


राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती ही घटनाबाह्य- भास्कर जाधव


उध्दव ठाकरेंचा आजार निवडणुकांवर परिणाम करणारा आहे. मात्र ते यातून लवकर बाहेर पडतील. एकीकडे सणासुदीत निवडणूक घेणार नाहीत असे म्हणत असताना निवडणूक आयोगाने नेमकी दिवाळीत निवडणुका जाहीर केल्या. वन नेशन वन इलेक्शन बाबत विरोधकांचा विरोध आहे, असा नरेटिव्ह भाजपकडून केला जातोय. तसेच राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती ही घटनाबाह्य आहे. राज्यपालांनी गॅझेट कधी काढलं? असा सवाल करत आमदार भास्कर जाधवांनी सरकारवर टीका केली आहे. 


मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागले नसतील तर तुमचे चेले चपाटे तुमचा भावी मुख्यमंत्री, असा उल्लेख का करतात? भाजपने आजवर जी जी कामे केलीत त्यांना भगदाड पडली आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात कोसळलेल्या दरड घटनेवर भास्कर जाधव यांनी भाष्य करत टीका केली आहे. 


श्रीकांत शिंदेंचा मेहुणा भास्कर जाधवांना भिडणार की भाजप जागा लढवणार?


ठाकरे गटाचे भास्कर जाधव हे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे शिंदे गटाने गुहागरमधून खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांना रिंगणात उतरवल्यास विधानसभा निवडणुकीत त्यांना भास्कर जाधव यांच्याशी दोन हात करावे लागतील. विपुल कदम यांच्या पाठीशी श्रीकांत शिंदे यांची संपूर्ण ताकद उभी राहणार असली तरी भास्कर जाधव यांच्यासारख्या आक्रमक नेत्याचा सामना करताना विपुल कदम यांचा कस लागण्याची शक्यता आहे. तर भाजपने देखील गुहागरची जागा लढवण्यावर आग्रही असल्याने ही जागा नेमकी कोणच्या वाट्याला जाणार, हे काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे. 


संबंधित बातमी: