बीड: विरोधकांना मतदान का केलं म्हणून बीडच्या नांदुर घाट गावात शंभर ते दीडशे लोकांच्या जमावाने एका कुटुंबाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पीडित कुटुंबाच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात ज्ञात 7 जण आणि अज्ञात 150 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यामध्ये विनयभांगचे कलमदेखील लावण्यात आले आहे.


बुधवारी रात्री याच प्रकरणातून दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याचे देखील पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितलं. या प्रकरणात पोलिसांनी योग्य ती कारवाई करून रात्रीच तणाव शांत केला. यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली.


नांदूर घाट गावात झालेल्या दगडफेकीमध्ये काही तरुण देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची पोलीस तक्रार नोंदवून घेतली जात नाही, गुन्हा दाखल केला जात नाही असा आरोप करण्यात आला.


बीडमध्ये जवळपास 71 टक्के मतदान 


राज्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान झालं असून यात बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरता सुमारे 70.92 टक्के मतदान झाले. बीडमध्ये राज्यात सर्वाधिक मतदान झालं असल्याची नोंद समोर येते आहे. चौथ्या टप्प्यात सर्वाधिक मतदानाची नोंद झालेल्या बीडमध्ये कुणाची धाकधूक वाढणार हे आता 4 जून रोजी समजणार आहे.


बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघात 74.79 टक्के मतदानाची नोंद झाली. तर बीड 66.09 टक्के,  गेवराई 71.43 टक्के, केज 70.31 टक्के, माजलगाव 71.61टक्के, परळी 71.31 टक्के  विधानसभा मतदारसंघात मतदान झाले. 


बजरंग सोनवणेंची 19 ठिकाणी फेरमतदानाची मागणी


दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी बीडमधील परळीत बुथ कॅप्चर करण्यात आल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. अनेक पोलिंग एजंन्टसला गायब करण्यात आलं, मतदारांना मारहाण झाल्याचा आरोप करत त्यांनी 19 गावात फेरमतदान घेण्याचीही मागणी केली. 


बीड लोकसभेसाठी यंदा पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्या चुरस दिसून आली असून मराठा आरक्षणाचा मुद्दा यावेळी चर्चेत आला होता. त्यामुळेच बीडमध्ये मराठा विरूद्ध ओबीसी अशी मतांची विभागणी झाल्याची चर्चाही जोरदार रंगल्याचं दिसतंय. 


ही बातमी वाचा: