अहमदनगर : राज्यातील चौथ्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी घसरल्याचं दिसून आलं. त्यात, 5 वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार सर्वात कमी मतदान शिरुर आणि पुणे लोकसभा मतदारसंघात झाल्याचं दिसून आलं आहे. मात्र, आज आणि काल मतदानाच्या पार्श्वभूमीवर शिरुर व अहमदनगर (Ahmednagar) मतदारसंघात मोठा गदारोळ पाहायला मिळाला. पारनेर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप निलेश लंकेंनी केला. त्यानंतर,आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी येथील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना विखे पाटील यांना लक्ष्य केलं. आता, रोहित पवार यांच्या टीकेला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Vikhe Patil) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तर, निलेश लंकेंच्या आरोपावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले.
रोहित पवारांचे ट्विट हे नैराश्यातून करण्यात आले आहे, बारामतीमध्ये पराभव दिसत असल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या मानसिकतेतून रोहित पवारांनी असं वक्तव्य केल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं. विखेंकडून बंद लिफाफ्यातून प्रसाद वाटप सुरू असल्याचं रोहित पवार यांनी ट्विट करून म्हटलं होत. रोहित यांच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देताना विखे पाटलांनी रोहित पवारांवर पलटवार केला. बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, येथील जनतेने यापूर्वी हे दाखवून दिलेलं आहे, असा खोचक टोला विखे पाटील यांनी लगावला.
पारनेर तालुक्यात विखे यांच्याकडून मतदानापूर्वी पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप होत आहेत. विशेष म्हणजे पैसे वाटपाचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याव राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. हे व्हिडिओ व टीका म्हणजे निर्माण केलेला फार्स असल्याचं त्यांनी म्हटलं. प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळ्या यंत्रणा आहेत, त्यांच्याकडे कोणीही गेलेलं नाही. सोशल मीडियावर चर्चा केली, लंके यांची भूमिका नेहमी नौटंकी करण्याची राहिली आहे. त्यामुळे त्यांचा हा प्रयोग त्यांच्याच अंगलट आला आहे, असेस्पष्टीकरण विखे पाटील यांनी दिले.
मतदान केंद्रावरील पत्रकामागची स्टोरी
पाथर्डी तालुक्यातील घुंमटवाडी येथे मतदान केंद्रावर कर्मचारी विखेंचे पत्रक दाखवत प्रचार करत असल्याचा व्हिडिओ निलेश लंके यांनी ट्विट केला होता. मात्र, या पत्रकामागची स्टोरीच विखे यांनी सांगितली. मतदान करण्यासाठी आलेल्या जेष्ठ नागरिकांच्या खिशात हे पत्रक होते आणि मतदान अधिकाऱ्यांनी ते काढून घेतल्यामुळे ते पत्रके त्यांच्याजवळ राहिली. मात्र, फार्स निर्माण करून येथे अधिकारीच प्रचार करत असल्याचा प्रसार करण्यात आल्याचे विखे यांनी म्हटलं.
हेही वाचा