बारामती: काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना बारामती व्यापारी महासंघाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली होती. आपल्याला बारामतीमध्ये व्यापाऱ्यांचा मेळावा घ्यायचा होता. त्यासाठी आपण बारामती व्यापारी महासंघाकडे (Baramati Traders) विचारणा केली होती. परंतु, त्यांच्याकडून तुर्तास व्यापारी मेळावा भरवणे शक्य नसल्याचे उत्तर आले. 50 वर्षांमध्ये असे कधीच घडले नव्हते, अशी खंत शरद पवार (Sharad Pawar) यांनी बोलून दाखवली होती. शरद पवारांच्या या नाराजीनंतर बारामती व्यापारी महासंघाचे पदाधिकारी खडबडून जागे झाले होते आणि त्यांची आपण लवकरच पवार साहेबांच्या सांगण्यानुसार व्यापारी मेळाव्याचे आयोजन करु, असे म्हटले होते.
त्यानुसार आता बारामतीत एका नव्या व्यापारी महासंघाने मेळाव्याचे आयोजन केले आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत बारामती स्वाभिमानी व्यापारी महासंघाच्यावतीने व्यापारी मेळाव्याचा आयोजन करण्यात आले आहे. येत्या 22 तारखेला मेळावा बारामतीतल्या महावीर भवन येथे पार पडणार आहे. शरद पवारांनी बारामतीतील व्यापारी महासंघाकडे मेळावा घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु मेळावा घेणे शक्य नसल्याचं व्यापारी महासंघाने शरद पवारांना कळवलं होतं. त्यासंदर्भात शरद पवारांनी वकिलांच्या मेळाव्यात खंत व्यक्त केली होती. त्यानंतर बारामतीत स्वाभिमानी व्यापारी महासंघाची स्थापना झाली आणि या महासंघाने शरद पवारांचा 22 तारखेला मेळावा ठेवला आहे.
नेमका प्रकार काय?
गेल्याच महिन्यात अजित पवार यांनी बारामतीत व्यापारी मेळावा घेतला होता. या कार्यक्रमात अजित पवारांनी शरद पवारांवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शरद पवार यांनी त्याच व्यासपीठावरुन बोलण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा मात्र व्यापाऱ्यांनी शक्य नसल्याचे कळवले. शरद पवारांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर शरद पवार गटाचे स्थानिक नेते आणि व्यापारी यांच्यात बैठक झाली आणि लवकरच मेळावा घेणार असल्याचे जाहीर केले. अजित पवारांच्या दबावातून शरद पवारांना नकार दिला असे विचारले असता व्यापाऱ्यांनी कोणताही दबाव नसल्याचे सांगितले. आम्ही शरद पवार साहेबांचा वेळ घ्यायला तयार आहोत. फक्त व्यापारी मेळाव्याच्या वेळेबाबत मिसकम्युनिकेशन झाल्याचे बारामती व्यापारी महासंघाकडून सांगण्यात आले होते.
अजित पवारांनी भाजपचा हात धरल्यानंतर बारामतीवर वर्चस्व दाखवण्यासाठी राजकीय डावपेच खेळले जात आहेत. बारामतीचा विकास कुणी केला? बारामतीच्या राजकारणात कुणाचा शब्द चालतो, हे दाखवण्याची जणू चढाओढ सुरु झाली आहे. या सगळ्यातून व्यापारी महासंघाच्या मेळाव्याचे राजकारण रंगल्याचे सांगितले जात आहे.
आणखी वाचा