बारामती: आगामी लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेची लढत म्हणून बारामती मतदारसंघाकडे पाहिले जात आहे.बारामतीमध्ये सुनेत्रा पवार या महायुतीच्या तर सुप्रिया सुळे या महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून रिंगणात उतरतील. या लढाईमुळे अजितदादा गट (Ajit Pawar) आणि शरद पवार गटाकडून सध्या बारामतीमधील विविध संस्था आणि कार्यकर्त्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर बारामतीमधील (Baramati) व्यापारी महासंघ सध्या चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी व्यापारी महासंघाकडे एक मेळावा घेण्याची इच्छा बोलून दाखवली होती. परंतु, व्यापारी महासंघाने त्याला नकार दिला होता. याबाबत शरद पवार (Sharad Pawar) यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली होती. मला बारामतीमध्ये व्यापारी मेळावा घ्यायचा होता. हा मेळावा घेणे शक्य नसल्याचे व्यापारी महासंघाकडून मला कळवण्यात आले. गेल्या 50 वर्षांमध्ये असे कधीच घडले नव्हते, अशी खंत शरद पवार यांनी बोलून दाखवली होती. त्यामुळे अजित पवारांच्या दहशतीमुळे व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतला का, अशी चर्चाही बारामतीमध्ये रंगली होती. 


शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर बारामतीच्या व्यापारी महासंघाचे धाबे दणाणले आहे. व्यापारी महासंघाकडून लगेचच सारवासारव करत शरद पवारांच्या कोणत्याही मेळाव्याला नकार दिला नसल्याची बाब स्पष्ट करण्यात आली. पवार साहेबांनी यापूर्वी आम्हाला मेळाव्यासंदर्भात विचारणा केली होती. परंतु, अपुऱ्या वेळेमुळे हा मेळावा आता घेऊ नये, असे आम्ही म्हटले होते. परंतु, शरद पवारांचा गैरसमज झाल्याने आम्ही मेळावा घेण्यास नकार दिल्याचे त्यांना वाटले, असे व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. आम्ही बारामतीत लवकरच व्यापारी मेळावा घेऊ. त्यासाठी आम्ही शरद पवार साहेबांची वेळ घेणार आहोत, असेही महासंघाकडून स्पष्ट करण्यात आले. 


बारामती व्यापारी महासंघाने नेमकं काय म्हटलं?


आम्ही शरद पवार साहेबांचा वेळ घ्यायला तयार आहोत. फक्त व्यापारी मेळाव्याच्या वेळेबाबत मिसकम्युनिकेशन झाले. पण आम्ही लवकरच पवार साहेबांची वेळ घेऊन मेळावा पार पाडणार असल्याचे व्यापारी महासंघाकडून सांगण्यात आले. 



नेमका प्रकार काय?


गेल्या महिन्यात अजित पवारांनी बारामतीत व्यापारी मेळावा घेतला होता. या मेळाव्यादरम्यान अजित पवारांनी शरद पवारांवर टीका केली होती. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक चर्चा झाल्या. पण जेव्हा शरद पवारांनी इच्छा व्यक्त केली तेव्हा मात्र व्यापाऱ्यांनी शक्य नसल्याचे कळवले. शरद पवारांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर शरद पवार गटाचे स्थानिक नेते आणि व्यापारी यांच्यात बैठक झाली आणि लवकरच मेळावा घेणार असल्याचे जाहीर केले. अजित पवारांच्या दबावातून शरद पवारांना नकार दिला असे विचारले असता व्यापाऱ्यांनी कोणताही दबाव नसल्याचे सांगितले. 


अजित पवारांनी वेगळी वाट चोखाळल्यानंतर बारामतीच्या राजकणात अनेक घटना घडू लागल्या आहेत. बारामतीचा विकास कुणी केला? बारामतीच्या राजकारणात कुणाचा शब्द चालतो, हे दाखवण्याची जणू चढाओढ सुरू आहे. शरद पवारांनी बारामतीतील विविध घटकांचा मेळावा घेतला, त्याचप्रमाणे घ्यायचा होता पण व्यापाऱ्यांनी नकार दिल्याने बारामतीतील व्यापाऱ्यांच्या बाबत नाराजीचा सूर उमटला होता. आता व्यापारी शरद पवारांना मेळाव्याचे आमंत्रण दिले तर शरद पवार मेळाव्याचे आमंत्रण स्विकारणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.


आणखी वाचा


शरद पवारांचा खास प्लॅन, महादेव जानकरांना माढ्यातून पाठिंबा देणार अन् बारामती सुरक्षित करणार?