Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती : महायुतीतील (Mahayuti) अंतर्गत वाद मिटवण्यासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या दोन महत्वाच्या बैठका पार पडल्या. बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha Constituency) तिढ्या सोडवण्यासाठी फडणवीसांची उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत बैठक पार पडली. तर, नगर दक्षिणमधील वाद मिटवण्यासाठी राम शिंदे, सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे यांच्यासोबत फडणवीसांची बैठक झाली. दोन्ही मतदारसंघांमधील वाद पक्षीय पातळीवर मिटले असल्याची माहिती, सूत्रांच्या वतीनं मिळत आहेत. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती मतदारसंघाचा वाद मिटवण्यासाठी सागर बंगल्यावर उशिरापर्यंत खलबतं सुरू होती. फडणवीस-हर्षवर्धन पाटलांमध्ये 2 तास चर्चा सुरू होती. वाद मिटला की नाही, हे सांगणं हर्षवर्धन पाटील यांनी टाळल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे वाद मिटला की नाही, याबाबत अद्याप अस्पष्टता आहे.  


देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट आदेश... 


अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून महायुतीच काम करा, असा सल्ला बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी दिल्याची माहिती मिळत आहे. बारामती आणि नगर संदर्भात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे यासंदर्भात आदेश दिले आहेत. महायुतीचा उमेदवार विजयी होईल एवढंच बघा, बाकी सगळं बाजूला ठेवा, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे. भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि विखे-शिंदे बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट आदेश दिले आहेत. तसेच, मिशन 45 प्लस यावरच संपूर्ण लक्ष ठेवा. अंतर्गत मतभेदांवरून महायुतीच्या उमेदवारावर परिणाम होता कामा नये, अशी समज देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या बैठकीत दिली आहे. 


शिवसेनेचे नेते विजय शिवतारे हे बारामीत लोकसभा लढवण्यावर ठाम आहेत. मात्र यामुळे त्यांच्यावर शिवसेनेकडून शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसे आदेश दिल्याचं कळतंय. याचं कारण म्हणजे बारामतीत सुनेत्रा पवारांना उमेदवारी द्यायची हा महायुतीचा निर्णय आहे, म्हणजेच शिवसेनेनं घटकपक्ष म्हणून सुनेत्रांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. अशा परिस्थितीत शिवतारे अपक्ष लढवणार असतील तर तो सरळ शिस्तभंग ठरतो. दरम्यान, बुधवारी भोरचा दौरा केल्यावर शिवतारे शनिवारी इंदापूरचा दौऱा करणार आहेत. या दौऱ्यात ते हर्षवर्धन पाटलांना भेटतात का ते पाहावं लागेल.