मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून स्वत: रिंगणात न उतरता आपला मुलगा जय पवार यांना उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत अजित पवार यांच्याकडून देण्यात आले आहेत. मी सात-आठ वेळा आमदार म्हणून निवडून आलोय. आता मला रस नाही. जय पवार (Jay Pawar) यांच्याबाबत जनता आणि पक्षाचे कार्यकर्ते निर्णय घेतील, असे वक्तव्य अजित पवार यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत बारामतीत अजितदादा गटाकडून जय पवार हे रिंगणात उतरतील, अशी जोरदार चर्चा आहे.  अशावेळी शरद पवार गटाकडून त्यांच्याविरुद्ध कोण रिंगणात उतरणार, अशी चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार गटाकडून गेल्या काही दिवसांपासून युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत बारामतीत जय पवार Vs युगेंद्र पवार अशी लढाई पाहायला मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.


युगेंद्र पवार यांनी लोकसभा निवडणुकीत बारामतीत सुप्रिया सुळे यांच्यासाठी झंझावाती प्रचार केला होता. ते पायाला भिंगरी लागल्याप्रमाणे बारामतीत फिरले होते. तेव्हापासून युगेंद्र पवार हे बारामती विधानसभेचे (Baramati Vidhan Sabah) उमेदवार असू शकतात, अशी चर्चा सुरु झाली होती. मध्यंतरी काही कार्यकर्त्यांनी थेट शरद पवार यांना भेटून, 'आम्हाला बारामतीचा दादा बदलायचाय', अशी मागणी केली होती. तर अलीकडेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही युगेंद्र पवार यांना बारामतीमधून रिंगणात उतरवण्याचे संकेत दिले होते. यावर युगेंद्र पवार यांनी सावधपणे भाष्य करताना म्हटले होते की, जर ज्येष्ठांनी उमेदवारी द्यायच ठरवलं तर मी विचार करेन. अशातच आता अजितदादांनी बारामती विधानसभेतून माघार घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता अजितदादांचे चिरंजीव जय पवार रिंगणात उतरल्यास त्यांच्यासमोर युगेंद्र पवार यांचे आव्हान उभे राहू शकते.


लोकसभा निवडणुकीपासून युगेंद्र पवार बारामतीमध्ये प्रचंड सक्रिय झाले होते. विधानसभेला आतापर्यंत अजित पवार बारामतीमधून डोळे झाकून निवडून यायचे, समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिटही जप्त व्हायचे. मात्र, लोकसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतरासंघातून सुप्रिया सुळे यांनी तब्बल 44 हजारांचे लीड मिळवले होते. युगेंद्र पवार यांनी बारामती मतदारसंघातील प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी मतदारसंघात विविध ठिकाणी बैठका घेऊन शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना धीर दिला होता. अजितदादा गटाच्या बारामतीमधील आक्रमकपणाला प्रत्युत्तर देण्यात युगेंद्र पवार यांची भूमिका महत्त्वाची होती. याशिवाय, त्यांनी अलीकडच्या काळात बारामती तालुक्यातील 100 पेक्षा जास्त गावांचा दौरा केला होता. त्यामुळे युगेंद्र पवार यांनी स्पष्टपणे उमेदवारी स्वीकारण्याची तयारी दर्शविली नसली तरी ते त्यांच्या पातळीवर बारामतीमध्ये मोर्चेबांधणी करत असल्याची चर्चा आहे.


कोण आहेत युगेंद्र पवार?


युगेंद्र पवार हे  अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. युगेंद्र पवार हे विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार आहेत. शरयू ग्रुपच्या माध्यमातून युगेंद्र पवार व्यवसायामध्ये सक्रिय आहेत. फलटण तालुक्यातील शरयू शुगर कारखान्याचा कारभार युगेंद्र पवार पाहतात. याशिवाय, ते 
बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांनीही अजित पवार यांच्यावर तिखट भाषेत टीका केली होती.


VIDEO: बारामती विधानसभेची निवडणूक रंगतदार होणार



आणखी वाचा


मला रस नाही, मी सात-आठवेळा आमदार, जय पवारांच्या बारामतीच्या उमेदवारीवर अजित पवारांचं रोखठोक भाष्य