Balasaheb Thorat On Sanjay Rathod: महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या संजय राठोड यांना मंत्रीमंडळात स्थान दिल्याने राज्यभरातून शिंदे सरकारविरोधात नाराजीचा सूर निघत असून टीका होताना पाहायला मिळत आहे. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही यावरुन शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे.
''शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळात एकही महिलेला स्थान नाही. मात्र महिला अत्याचाराचे ज्यांच्यावर आरोप झाले. अशांना मंत्रीमंडळात स्थान दिले. हे दुर्देवी आहे'', असे म्हणत नाव न घेता बाळासाहेब थोरात यांनी संयज राठोड यांच्यावर निशाना साधला आहे. तर दुसरीकडे संजय राठोड हे शिंदे सरकारमध्ये गेल्यावर निष्कलंक झाले असतील, असा टोलाही यावेळी थोरात यांनी शिंदे सरकारला लगावला आहे. संजय राठोड यांच्याबद्दल पक्षात नाराजी असल्याचं सांगायचं आणि दुसरीकडे त्यांना मंत्रीपद द्यायचं. हे जनता पाहत आहे. आगामी काळात जनता योग्य तो निर्णय घेईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
'विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसच दावा करणार'
विरोधी पक्ष नेतेपदावरुन काँग्रेसची शिवसेनेवर नाराजी असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सागितलं. महाविकास आघाडीत एकत्र असतांना शिवसेनेने परस्पर विरोधी पक्ष नेतेपदासाठी त्यांचा उमेदवाराच नाव देणे, हे चुकीचं आहे. याबद्दल आमची नाराजी असून आम्हाला विश्वासात घेणं गरजेचे आहे, असे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे. तसेच विरोधी पक्ष नेत्यांवर आमचाही दावा राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. उद्या याबाबत बैठक होणार असून या बैठकीत चर्चा करुन एकत्रित निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे.
काँग्रेसचे नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे आज काँग्रेसच्या आजादी गौरव पदयात्रेनिमित्त जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातल्या पातोंडा येथे ढगफुटी सदृश्य पावसामुळे मोठे नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त भागाची पाहणी बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
अतिवृष्टीने दहा लाखे हेक्टरपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे नुकसान झालेल आहे. मात्र पंचनामे सुध्दा झालेलं नाही. मंत्रीमंडळाचा विस्तार उशीरा झाला, आता खातेवाटप कधी होईल हे माहित नाही. मात्र मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिंदे सरकारवर टिका केली आहे. मात्र विधानसभेच्या अधिवेशनातही याबाबत आवाज उठवणार असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
'भाजपानेच संपूर्ण जनतेला धोका दिला'
बिहारमधील राजकारणावर बोलतांना बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. ज्यांनी भाजपला धोका दिला आहे, तो पक्ष संपतो, यावर प्रश्न विचारला असता, बाळासाहेब थोरात म्हणाले की, भाजपानेच संपूर्ण जनतेला धोका दिला आहे आणि देत आहे. महागाई आणि बेरोजगारी दूर करण्याच्या घोषणा भाजपने केल्या. मात्र त्याउलट प्रचंड महागाई झाली, बेरोजगारी वाढतेय. केवळ आश्वासने देवून भाजपने सत्ता मिळवली व जनतेला भाजपने धोका दिला. त्यांना काय कोण धोका देणार या शब्दात बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर निशाना साधला.