Aurangabad News: कालच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून, या मंत्रीमंडळात पैठणचे आमदार संदिपान भुमरे यांना संधी मिळाली आहे. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून धक्का बसला आहे. कारण भुमरे यांच्या मतदारसंघातील ज्या गावात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सभा घेतली होती, त्या गावातील विविध कार्यकारी सहकारी संस्था सोसायटीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. तर शिवसेनेचे 13 पैकी 13 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 


एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातून 'शिव संवाद यात्रा' काढली होती. दरम्यान पैठणचे आमदार संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघातील बिडकीन गावात सुद्धा आदित्य यांची 'शिव संवाद यात्रा'  निघाली होती. यावेळी आदित्य यांनी सभा सुद्धा घेतली होती. त्यांनतर या गावात पहिल्यांदाच झालेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्था सोसायटीच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या सेना गटाने संपूर्ण उमेदवार बिनविरोध निवडून आणल्याचा दावा केला आहे. शिवसेना तालुका प्रमुख मनोज पेरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. तर भुमरे यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांना संपर्क केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 


भुमरेंसाठी मोठा धक्का...


बिडकीन गाव हे एक मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे. तसेच पैठण मतदारसंघाच्या राजकीय गणितानुसार बिडकीनला महत्व आहे. तर या गावाला तालुक्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव सुद्धा शासनस्तरावर प्रलंबित आहे. त्यामुळे या गावातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणारा पराभव भुमरे यांच्यासाठी धक्का समजला जातोय. त्यामुळे आगामी काळात या गावातील सत्ता आपल्या ताब्यात घेण्याचे भुमरे यांच्यासाठी आव्हान ठरणार आहे. 


ग्रामपंचायत निवडणुकीत भुमरेंची एकहाती सत्ता...


बिडकीन गावात शिवसेनेला सत्ता मिळाली असली तरीही, गेल्या आठवड्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भुमरे यांना एकहाती सत्ता मिळाली आहे. पैठणमध्ये एकूण 7 ग्रामपंचायतसाठी निवडणूक झाली होती. तर सातपैकी 6 ग्रामपंचायतवर भुमरे यांचे वर्चस्व पाहायला मिळाले. तर पैठण तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायत भुमरे यांच्या ताब्यात आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याने तालुक्यात ताकद वाढण्याची शक्यता आहे. 


महत्वाच्या बातम्या...


धक्कादायक! 'हर घर तिरंगा'साठी सदोष राष्ट्रध्वजाचा पुरवठा; ठेकेदारांचा प्रताप


Aurangabad: विरोधी पक्षनेतेपदी निवड झालेल्या अंबादास दानवेंचं औरंगाबादेत जंगी स्वागत