Balasaheb Thackeray Portrait : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) तैलचित्र अनावरण सोहळा 23 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी सहा वाजता पार पडणार आहे. या सोहळ्याची आमंत्रण पत्रिका (Invitation Card) नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या आमंत्रण पत्रिकेत बाळासाहेबांचे पुत्र आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नावाचा मात्र समावेश नाही. उद्धव ठाकरे यांना दुसरी आमंत्रण पत्रिका पाठवण्यात येईल अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसाद ओक करणार आहे. 


प्रोटोकॉलनुसार आमंत्रण पत्रिकेत शासकीय पदं असेलल्या व्यक्तींची नावं


या आमंत्रण पत्रिकेत प्रोटोकॉलनुसार शासकीय पदं असलेल्या व्यक्तींची नाव छापण्यात आली आहेत, ज्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, विधानपरिषद सभापती आणि उपसभापती यांचा समावेश आहे. आम्ही ठाकरे कुटुंबातील सगळ्यांनाच सन्मानपूर्वक आमंत्रित केलं आहे, असं विधानसभा अध्यक्षांकडून सांगण्यात आलं आहे. परंतु व्यासपीठावर नेमकं कोण कोण असणार हे अद्याप सांगितलेलं नाही. पुढील एक दोन दिवसात ठाकरे कुटुंबियांना, आमदार-खासदारांना तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रण पाठवलं जाणार आहे. आता या सोहळ्याला उद्धव ठाकरे हजर राहणार का हे पाहावं लागेल.


बाळासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून सेंट्रल हॉलमध्ये तैलचित्र


विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावण्यात येणार आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात बाळासाहेबांचे तैलचित्र लावण्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरेंचे तैलचित्र विधानभवनात बसवण्याबाबत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार निर्णय घेतल्याचं नार्वेकर यांनी विधिमंडळाच्या नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात जाहीर केलं होतं. त्यानुसार 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.  


सेंट्रल हॉलमध्ये सध्या कोणाकोणाचे तैलचित्र?


खालील महापुरुष/स्त्रियांचे तैलचित्र आहे 


छत्रपती शिवाजी महाराज
महात्मा ज्योतिबा फुले,
लोकमान्य टिळक
महात्मा गांधी
पंडित जवाहरलाल नेहरू
डॉ बाबासाहेब आंबेडकर



सावित्रीबाई फुले
अहिल्याबाई होळकर
यशवंत राव चव्हाण
इंदिरा गांधी
राजमाता जिजाबाई
दादासाहेब मालवणकर
एस एम जोशी
स्वामी रामानंद तीर्थ
झाशीची राणी
स्वांत्र्यंत्रविर सावरकर
नेताजी सुभाष चंद्र बोस


आता यात बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र येणार आहे.


संबंधित बातमी


Thackeray Shinde: 'बाळासाहेबां'साठी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर येणार?