Teachers Constituency Elections Nagpur : राजकीय बेरीज वजाबाकीसह विविध ट्विस्ट नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत येत आहेत. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एकूण 22 उमेदवारांपैकी 5 उमेदवार कोट्यधीश असल्याची माहिती निवडणुकीला उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांची पाहणी केली असता समोर आली आहे. तसेच 50 लाख ते एक कोटीदरम्यान संपत्ती असलेल्या उमेदवारांची संख्या सात आहे. मात्र शून्य संपत्ती असलेलेही तीन उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, हे उल्लेखनीय.


नागपूर विभागात एकूण 27 जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यापैकी काल 5 जणांनी आपला अर्ज मागे घेतला. विधानपरिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या रिंगणात 22 उमेदवार उभे राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसे पाहिले तर या निवडणुकीत शिक्षक किंवा शिक्षण क्षेत्राशी निगडित उमेदवारच उभे राहतात असा समज आहे. मात्र प्रत्यक्षात 50 टक्के उमेदवारदेखील विद्यमान शिक्षक नाहीत. तसेच उभ्या असलेल्या 18 टक्के उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल असून त्यात बहुतांश शिक्षकच आहेत.


सध्या निवडणूक रिंगणात असलेल्या 22 उमेदवारांपैकी चार उमेदवारांविरोधात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. यातील एका शिक्षकाविरोधात चक्क अफरातफर आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. एका शिक्षकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल असून एकाविरोधात राजकीय आंदोलनांचे तीन गुन्हे आहेत. व्यवसायाने बिल्डर असलेल्या एका उमेदवाराविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या निवडणुकीतदेखील गुन्हे असलेले उमेदवार उभे असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.


तीन उमेदवारांची संपत्ती आणि वार्षिक उत्पन्नही शून्य


निवडणुकीत उभ्या असलेल्यांपैकी 13 टक्के म्हणजे तीन उमेदवारांकडे एकही रुपयाची संपत्ती नाही. तर 32 टक्के म्हणजे 7 उमेदवारांची संपत्ती ही 50 लाख ते 1 कोटीदरम्यान असून 22 टक्के म्हणजेच 5 उमेदवार कोट्यधीश आहेत. या मतदारसंघात उभे असलेल्यांपैकी 72 टक्क्यांहून अधिक उमेदवारांचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांच्या वर आहे. 27 टक्के उमेदवारांचे वार्षिक उत्पन्न तर 20 लाख किंवा त्याहून अधिक आहे. तर 13 टक्के म्हणजे 3 उमेदवारांनी त्यांचे उत्पन्न शून्य रुपये असल्याचे दाखवले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यात एका शिक्षकाचादेखील समावेश आहे.


दोनच उमेदवार पीएच.डी  तर एक दहावी पास


या निवडणुकीत उच्चशिक्षित उमेदवारांचा भरणा असला तरी केवळ दोन उमेदवार हे पीएचडी प्राप्त आहेत. याशिवाय दोन उमेदवारांकडेच केवळ एक पदवी असून एक जण केवळ दहावी उत्तीर्ण आहे. उर्वरित सर्व उमेदवार हे दोन किंवा त्याहून अधिक पदवीधारक आहेत. शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत अर्ध्याहून अधिक उमेदवार हे पन्नाशी ओलांडलेले आहेत. 22.72 टक्के उमेदवार साठीच्या पुढचे असून 36 टक्के उमेदवार पन्नासहून अधिक आहेत. 22 टक्के उमेदवार 45 हून कमी वयाचे आहेत.


शेतकरी, व्यावसायिकही निवडणूक रिंगणात


या निवडणुकीत 45 टक्के उमेदवारच सद्यस्थितीत शिक्षक किंवा मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. 9 टक्के उमेदवार व्यावसायिक असून तेवढेच उमेदवार शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. याशिवाय 22 टक्के उमेदवार सेवानिवृत्त झालेले आहेत.


ही बातमी देखील वाचा...


राष्ट्रवादीतून निलंबित सतीश इटकेलवार म्हणाले, पक्षाचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण...