अकोला: विधानसभाअध्यक्ष राहुल नार्वेकर(Rahul Narwekar) यांची 'नार्को टेस्ट' करण्याची खळबळजनक मागणी अकोला जिल्ह्यातील बाळापुरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी केली. ते म्हणाले की, "सत्तासंघर्षाचा निकाल  (MLA Disqualification Case)  आधीच ठरलेला आहे. भाजपनं सांगितला तसा निकाल विधानसभा अध्यक्ष देतील. जर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची 'नार्को टेस्ट' केली तर यातील सर्व सत्य बाहेर येईल. जे गद्दार आहेत त्यांना आजच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर रात्री झोप आली नसेल. आम्ही निर्धास्त झोपलो. आम्हाला निकालाची चिंता नाहीय. निकाल काहीही लागला तरी आमचा जनतेवर विश्वास असून आमचा देव असलेल्या बाळासाहेबांचा आशिर्वाद आमच्या पाठीशी असेल", असं नितीन देशमुख म्हणाले. ते अकोला येथे बोलत होते. 


राहूल नार्वेकर यांची 'नार्को टेस्ट' करा


शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणावर आज ऐतिहासिक निकाल येईल. या निकालाने राज्याच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर थोड्याच वेळात अंतिम निकाल देणार आहेत. विधानसभा अध्यक्षांनी नियमांनुसार निकाल दिला तर शिंदे गटाचे आमदार अपात्र होतील, असा दावा ठाकरे गटाकडून केला जातोय. आजच्या सत्तासंघर्ष निकालाचा कोणताही ताण आमदार नितीन देशमुख यांच्यावर दिसत नाहीये. ते आजही नित्याप्रमाणे सकाळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 'मॉर्निंग वॉक'ला गेले. त्यावेळी त्यांनी आपला नियमित व्यायाम केला. यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी आपले आजच्या आमदार अपात्रता प्रकरणावर आपले परखड मत मांडले आहे.


... तर सर्व सत्य बाहेर येईल


 जर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची 'नार्को टेस्ट' केली तर यातील सर्व सत्य बाहेर येईल. निकाल देणारे न्यायाधीश नार्वेकर मुख्यमंत्र्यांना भेटतात, यातच सारं आलं. जे गद्दार आहेत त्यांना आजच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर रात्री झोप आली नसेल. आम्ही निर्धास्त झोपलो. आम्हाला निकालाची चिंता नाहीय. आमचा देव असलेल्या बाळासाहेबांचा आशिर्वाद आमच्या पाठीशी आहे. निकाल काहीही लागला तरी आमचा जनतेवर विश्वास आहे. आम्ही आणखी ताकदीने जिल्ह्यातून आणि राज्यातून जास्तीत जास्त आमदार निवडून आणत उद्धवसाहेबांचे हात मजबूत करू. असा विश्वास आमदार नितीन देशमुख यांनी बोलतांना व्यक्त केला.  


नितीन देशमुख पात्र की अपात्र ठरणार?


ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख पात्र ठरणार की अपात्र याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत नितीन देशमुख सुरतला गेले होते. गुवाहाटीला जाताना त्यांनी तेथून पलायन केले अन् थेट मुंबई गाठली. नितीन देशमुख सध्या उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहेत. आज ते पात्र ठरणार की अपात्र याबाबतचा निर्यण येणार आहे. एकनाथ शिंदेंसोबत सूरतला गेले त्यावेळी नितीन देशमुख हरवल्याची तक्रार त्यांची पत्नी प्रांजली देशमुख यांनी केली होती. नितीन देशमुख यांनी सुरतवरुन मुंबईत परत येण्याचा थरार सांगितला होता. सूरतमध्ये पोलिसांचा कसा बंदोबस्त होता, याचंही वर्णन केले होते. सत्तासंघर्षावेळी नितीन देशमुख यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली होती.