Nitin Deshmukh ACB Inquiry : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अकोला (Akola) जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागासमोर (ACB) हजर राहणार आहेत. बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपांप्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे. काही दिवसांपूर्वीच आमदार नितीन देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं होतं. त्यानुसार आज आमदार देशमुख हे अमरावती (Amravati) इथल्या एसीबीच्या विभागीय कार्यालयात चौकशीसाठी हजर होणार आहेत. "आपण शिंदे सरकारची चौकशी आणि कारवाईमुळे अजिबात डगमगणार नाही," असं नितीन देशमुख यांनी एबीपी माझाशी बोलताना ठणकावून सांगितलं.


ठाकरे गटाकडून शक्तिप्रदर्शन


आमदार नितीन देशमुख यांच्या आजच्या चौकशीनिमित्त ठाकरे गटाकडून मोठं शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. नितीन देशमुख आज सकाळी दहा वाजता अकोल्यातील त्यांच्या कार्यालयातून अमरावतीकडे प्रयाण करणार आहेत. अकोल्यातून जवळपास 700 कार्यकर्ते देशमुखांसोबत अमरावती इथे जाण्याची शक्यता आहे.


चौकशीचा दिनचर्येवर परिणाम नाही


दरम्यान, चौकशीचं शुक्लकाष्ठ मागे लागलेलं असतानाही आमदार नितीन देशमुख यांच्या दिनचर्येवर कोणताही परिणाम झालेला नाही. ते दररोजप्रमाणे आजही डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात वॉकसाठी गेले होते. त्यांनी आपला रोजचा व्यायामही केला. शिंदे सरकारच्या चौकशा आणि कारवाईने अजिबात डगमगणार नसल्याचं आमदार देशमुख म्हणाले. 


सत्तानाट्यानंतर चर्चेचे आले नितीन देशमुख


राज्यातील अभूतपूर्व सत्तानाट्यामध्ये शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनीही सुरत गाठलं होतं. यावेळी प्रकृतीच्या कारणावरुन त्यांना सुरत इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं होते. त्यावेळी आमदार नितीन देशमुख यांचं नाव राज्यात चर्चेत आलं होतं. इतकंच नाही तर नितीन देशमुख शिंदे गटासोबत सूरतमध्ये असताना त्यांच्या पत्नीने अकोल्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. नितीन देशमुख हे शिंदे गटासोबत गुवाहाटी इथे देखील गेले होते. परंतु गुवाहाटीवरुन ते नागपूरमार्गे अकोल्यात परतले. गनिमी काव्याने शिंदेंच्या तावडीतून आपण सुटका करुन घेतल्याचं देशमुख म्हणाले होते. परंतु ज्या विमानातून देशमुख परत आले त्याची व्यवस्था आपणच करुन दिली होती, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला होता.


VIDEO : Nitin Deshmukh ACB Inquiry : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख एसीबीसमोर हजर राहणार