बीड : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपली आहे, राजकीय नेत्यांमधील ताण-तणाव आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही बंद झाल्या आहेत. निवडणुकांवेळी एकमेकांविरुद्ध उभारलेले कार्यकर्तेही आता चाय पे चर्चा करत आहेत. सर्वांना उत्सुकता लागली आहे ती, 4 जूनच्या निकालाची. मात्र, मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने बीड (Beed) लोकसभेत वेगळचं राजकारण पाहायला मिळालं. येथील जातीय राजकारणाची झळ अद्यापही कायम असल्याचं दिसून येत आहे. कारण, सोशल मीडियात व्हायरल (viral video) झालेल्या एका व्हिडिओमुळे बीड जिल्ह्यातील मुंडेवाडी गावची चर्चा होत आहे. एका विशिष्ट समाजाच्या दुकानातून खरेदी न करण्याचं आवाहन करणाऱ्या व्हिडिओत नेतेमंडळींच्या प्रतिक्रिया येत आहेत. तर, गावात कुठलाही तणाव नाही, लोकं गुण्या-गोविंदाने राहात असल्याचं बीडचे पोलीस (Police) अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी म्हटलं आहे. 


बीडमधील मुंडेंवाडीतील एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गावातील पोलिसांनी आज गावात भेट दिली. तर, महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेंनीही मुंडेवाडी हे गाव चांगलं आहे, माझ्याच तालुक्यातलं ते गाव असून येथील लोकं जातीवादावर काम करणारे नसल्याचं म्हटलं आहे. तर, आमदार बच्चू कडूंनी संतप्त प्रतिक्रिया देत, हे हिंदवी स्वराज्याचं पतन असल्याचं म्हटलं आहे. 


गावचे लोक जातीवादावर काम करणारे नाहीत


मुंडेवाडी हे गाव चांगलं आहे, तेथील लोक जातीवादावर काम करणारे नाहीत. केवळ वंजारीच नाही, तर दलित, बौद्ध समाजही गावात आहे. माझ्या केज तालुक्यातील ते गाव असल्याने मला चांगलं माहिती आहे. यापूर्वीही त्या गावाने वेगवेगळ्या उमेदवारांना मतदान केलंय. मात्र, या गावाने अशा पद्धतीने टोकाचं आवाहन करणं चुकीचं आहे. माझं गावातील सर्वांनाच आवाहन आहे की, आपल्या संस्कृतीला जपण्याचं काम आपण केलं पाहिजे. बहुजन समाजात सर्वचजण आले, सर्वांनी एकोप्याने राहिलं पाहिजे, असे बजरंग सोनवणेंनी म्हटले. या घटनांमागे जे कोणी असतील, त्यामागे प्रशासनाने डोळसपणे तपास केला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. प्रशासन कुठं आहे, कलेक्टर, एसपी काय करतात?, असा सवाल सोनवणेंनी उपस्थित केला. तसेच, अशा गोष्टीत मी राजकीय कुणाला दोष देणार नाही, कुणाचं नाव घेण्याची माझी संस्कृती नाही. माझा सवाल प्रशासनाला आहे, असे बजरंग सोनवणेंनी घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटले.  



शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे पतन - कडू


बीड जिल्ह्याची घटना ही धोक्याची घंटा आहे. मतदानाच्या माध्यमातून लोकभावना राष्ट्रभावना निर्माण व्हायला पाहिजे होत्या. आम्ही राजकीय नालायक लोकांनी जातीय भावना पेरल्या आहेत. कारण, आमच्यात कामं करण्याची धमक नव्हती. जिथं कामं दाखवायला नाहीत, तिथं आम्ही जात पेरली, अशा शब्दात आमदार बच्चू कडू यांनी मुंडेवाडी गावातील घटनेवर भाष्य करत राजकीय नेत्यांनाच लक्ष्य केलं आहे. जातीवादाचं हे बी राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्यांनी पेरलं आहे. त्याचे परिणाम आता गाव स्तरावर दिसत आहेत. पण, हे शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे पतन आहे, असे म्हणत कडू यांनी खंत व्यक्त केली. महाराष्ट्र हा साधू संतांचा देश आहे.अशा घटना कुठलाही समाज करीत असेल तर त्यावर कारवाई झाली पाहिजे.वंजारी समाजाच्या अशा भावना का निर्माण झाल्या, याचंही संशोधन झालं पाहिजे. वेळ आली तर आम्ही देखील त्या गावात जाऊ आणि हा वाद मिटविण्याच्या प्रयत्न करू, असेही आमदार कडू यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले. 


हेही वाचा


Video: एबीपी माझा इम्पॅक्ट: बीड पोलीस ॲक्शन मोडवर, SP थेट मुंडेवाडीत; गुन्हा दाखल, आरोपीला अटक


Video: बीडमध्ये मराठा - वंजारी वाद कोण पेटवतंय?, एकमेकांच्या दुकानातून खरेदी नाही, केल्यास मोठा दंड