बीड: बारामती आणि बीडमध्ये बोगस मतदान केल्याचा आरोप शरद पवारांनी केल्यानंतर त्यांच्या गटाचे बीडचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonavane) यांनी ईव्हीएम मशिन ज्या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत त्या स्ट्राँग रुमला भेट दिली. परळीला आम्ही बदनाम करायची गरजच नाही, तुम्ही आधीच बदनाम केलंय असा टोला त्यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता लगावला.
बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी केलेली आहे. मात्र मागच्या दोन-तीन दिवसांमध्ये काही व्हिडीओज समोर आल्यानंतर सोमवारी बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष महबूब शेख यांच्यासह बीड शहराच्या बाजूला असलेल्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये बनवलेल्या स्ट्राँग रूमला भेट दिली.
स्ट्राँग रूमची पाहणी करण्यासाठी ही भेट दिली असल्याचं सांगत बजरंग सोनवणे यांनी बीडच्या जिल्हा पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनावर आरोप केले. या निवडणुकीत प्रशासनाने एकतर्फी काम केल्याचा पुन्हा एकदा आरोप त्यांनी केला. परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये अनेक ठिकाणी बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी करण्यासाठी आम्ही एसपी आणि कलेक्टर यांच्याकडे दिल्या. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप यावेळी बजरंग सोनवणे यांनी केला.
बीडमध्ये 71 टक्के मतदान
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरता सुमारे 70.92 टक्के मतदान झाले. चौथ्या टप्प्यात बीडमध्ये राज्यात सर्वाधिक मतदान झालं. चौथ्या टप्प्यात सर्वाधिक मतदानाची नोंद झालेल्या बीडमध्ये कुणाची धाकधूक वाढणार हे आता 4 जून रोजी समजणार आहे.
बजरंग सोनवणेंची 19 ठिकाणी फेरमतदानाची मागणी
दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी बीडमधील परळीत बुथ कॅप्चर करण्यात आल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. अनेक पोलिंग एजंन्टसला गायब करण्यात आलं, मतदारांना मारहाण झाल्याचा आरोप करत त्यांनी 19 गावात फेरमतदान घेण्याचीही मागणी केली.
बीड लोकसभेसाठी यंदा पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्या चुरस दिसून आली असून मराठा आरक्षणाचा मुद्दा यावेळी चर्चेत आला होता. त्यामुळेच बीडमध्ये मराठा विरूद्ध ओबीसी अशी मतांची विभागणी झाल्याची चर्चाही जोरदार रंगल्याचं दिसतंय. बीडमध्ये आता कोणता मुद्दा कळीचा ठरला हे येत्या 4 जून रोजी स्पष्ट होणार आहे.
ही बातमी वाचा: