मुंबई : महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठं यश मिळालं आहे. महाविकास आघाडीला (Mahavikas aghadi) 30 जागा जिंकता आल्या असून महायुतीला 17 जागांवरच समाधान मानावे लागले. तर, अपक्षाने एक जागा जिंकून यश मिळवलं. त्यानंतर, सर्वच नवनिर्वाचित खासदार पक्षनेतृत्वाची भेट घेऊन आभार मानत आहेत. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आज राष्ट्रवादीच्या नव्याने विजयी झालेल्या 8 खासदारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव होता, त्यासाठी सर्वच नवनियुक्त खासदार शरद पवारांसह मुंबईत उपस्थित होते. यावेळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सर्वच विजयी खासदारांची ओळख करुन दिली. त्यावेळी, बीडचे खासदार बंजरंग सोनवणेंचा (Bajrang sonavane) उल्लेख जायंट किलर म्हणून केला. 


शरद पवारांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्रात महाविकास आघाडीलं मोठं यश मिळालं. त्यात, 10 जागा लढवणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 8 जागांवर विजय मिळवला. त्यामध्ये, बारामती, अहमदनगर आणि बीड लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या तिन्हीही जागेवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे, सर्वच उमेदवारांची अधिकृत ओळख सांगताना जयंत पाटील यांनी विशेष उल्लेख केला. जयंत पाटील पहिल्यांचा शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हेंची ओळख करुन दिली. ज्यांना पाडण्यासाठी बड्या-बड्यांनी प्रयत्न केले, पण ते निवडून आले. त्यानंतर, जायंट किलर म्हणून उल्लेख करत बजरंग सोनवणेंचं अभिनंदन केलं. आमच्या पक्षाला बजरंग बली पावला, असेही जयंत पाटील यांनी म्हटलं. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या या कार्यक्रमात शरद पवारांच्या उजव्या हातालाच बजरंग बप्पांची खुर्ची असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, बजरंग बप्पांनी राष्ट्रवादीत मानाचं स्थान मिळवल्याचं दिसून येत आहे.



आमचा स्ट्राईक रेट 80 टक्के


शरद पवार ज्या बाजुने त्या बाजुने स्ट्राईक रेट चांगला राहिला आहे. आमचा स्ट्राईक रेट 80 टक्के आहे. त्यामुळे, मी महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांचे अभिनंदन करतो, व जनतेचे आभार मानतो, असेही पाटील यांनी म्हटले. दरम्यान, निलेश लंके आणि सुप्रिया सुळे हे दोन खासदार त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त मतदारसंघात होते, त्यामुळे ते आजच्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. याव्यतिरिक्त राष्ट्रवादीचे सर्वच सहाही खासदार राष्ट्रवादी कार्यालयात उपस्थित होते.  


6 हजार मतांनी विजयी


बीड लोकसभा मतदारसंघात बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे यांच्यात थेट लढत झाली. शरद पवारांनी ऐनवेळी बजरंग सोनवणेंना उमेदवारी देऊन बीडमधील निवडणुकीत मोठी रंगत वाढवली. बीड हे मराठा आरक्षणाचं केंद्रस्थान बनलं असून उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकांचं माहेरघरही बीड जिल्हा झाला आहे. त्यामुळे, बीडच्या निवडणुकीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अखेर, बजरंग सोनवणेंना मराठा आरक्षण आंदोलनाचा व मनोज जरांगेंचा फायदा झाला. त्यामुळे, सोनवणे 6 हजार मतांनी निवडून आले. त्यानंतर, त्यांनी रात्री उशिराच मनोज जरांगेंची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. तुमच्यामुळेच मी निवडून आलो, असेही त्यांनी म्हटले.  


लोकसभा निवडणुकीत कोणाला किती  जागांवर विजय मिळाला?


देशपातळीवरील समीकरणं


एनडीए आघाडी- 294
इंडिया आघाडी- 232
इतर-17


महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल


महाविकास आघाडी- 30
महायुती- 17
अपक्ष- 1


महायुतीमधील पक्षीय बलाबल


भाजप- 9
शिवसेना (शिंदे गट)-7
राष्ट्रवादी काँग्रेस-1


महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?


काँग्रेस- 13
ठाकरे गट-9
शरद पवार गट-8