नागपूर: बदलापूरच्या शाळेत चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या अक्षय शिंदे याचा महायुती सरकारच्या काळात पोलीस एन्काऊंटरच्या माध्यमातून सोक्षमोक्ष लागला होता. मुंब्रा बायपास परिसरात 23 सप्टेंबर रोजी झालेल्या पोलीस चकमकीत अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter) मारला गेला होता. मात्र, याप्रकरणात नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगाने हा संपूर्ण एन्काऊंटर बनावट असल्याचा अहवाल दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी हा अहवाल सादर करण्यात आला. यामध्ये अक्षय शिंदे याच्यासोबत गाडीत असलेल्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी बळाचा गैरवापर केला. त्यामुळे अक्षयच्या मृत्यूसाठी हे पाच पोलीस कर्मचारी जबाबदार आहेत, असे चौकशी अहवालात म्हटले आहे. यावरुन विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. 


यासंदर्भात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करुन राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. बदलापूर  प्रकरणात आरोपी असलेल्या अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी पाच पोलीस जबाबदार असल्याचा निष्कर्ष न्यायालयाच्या चौकशीत समोर आला आहे. त्याचप्रमाणे बंदुकीवर अक्षय शिंदेचे बोटाचे ठसे नसल्याचे फॉरेन्सिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. बदलापूर प्रकरणी एकीकडे भाजप संस्थाचालकांवर कारवाई झालीच नाही तर दुसरीकडे आरोपी अक्षय शिंदेचे फेक एन्काऊंटर करून भाजपशी संबंधित संस्था चालकाला वाचवण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन सरकारने मांडलेल्या फेक नरेटिव्हची आज उच्च न्यायालयाने पोलखोल केली आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 


या एन्काऊंटरची जबाबदारी जितकी पोलिसांची आहे तितकी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. कारण ‘एकनाथचा एक न्याय‘ आणि ‘देवाभाऊचा न्याय‘ म्हणून स्वतःला हिरो बनवून घेण्यासाठी या एन्काऊंटर चे श्रेय घेण्याची स्पर्धा लागली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने फक्त मतांसाठी मांडलेला बाजार हळूहळू समोर येत आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर केली. 


बदलापूर एन्काऊंटर फेक असल्याचा अहवाल, अजित पवार म्हणाले...


मी यासंदर्भात टीव्हीवर बातम्या बघत होतो. मी आता मुंबईला चाललो आहे. याबाबत गृह मंत्रालयाच्या सचिवशी बोलेल आणि काय नक्की झालं, त्यांनी चौकशी केली, त्यांनी काय केलं अंतिम चित्र काय दिसतं याची माहिती घेऊन स्पष्ट बोलतो, अशी मोजक्या शब्दांतील प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.



आणखी वाचा


मोठी बातमी : बदलापूर बलात्कारातील आरोपी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर फेक, चौकशी समितीचा 5 पोलिसांवर ठपका!