मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांना भेटीसाठी बोलावलं आहे. बच्चू कडू मुंबईकडे रवाना झाले आहे. बच्चू कडू यांनी नवनीत राणांविरोधात (Navneet Rana) अमरावतीमधून (Amravati) उमेदवार देण्याची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यांना भेटीचं निमंत्रण पाठवलं. नवनीत राणांकडून कार्यकर्त्यांना धमक्या येत असल्यामुळे आम्ही त्यांचा प्रचार न करता अमरावतीमध्ये प्रहारचा उमेदवार देणार असल्याचं बच्चू कडू यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वादात संपुष्टात येणार का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर बच्चू कडूंची नाराजी दूर होणार?
अमरावती लोकसभेसाठी प्रहार जनशक्ती पक्ष स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा आमदार बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी केली आहे. प्रहारला अमरावती मतदारसंघात चांगला उमेदवार मिळाला असून लवकरच त्याची घोषणा होईल, असं बच्चू कडू यांनी सांगितलं होतं. प्रहारचा उमेदवार दीड लाख मतांनी निवडून येईल असा दावा बच्चू कडू यांनी केला होता. त्यामुळे हा उमेदवार नेमका कोण आणि बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडले का असा सवाल उपस्थित होत होता. पण, त्यानंतर बच्चू कडू यांनी आपण महायुतीत असल्याचं स्पष्ट केलं होतं.
नवनीत राणांना भाजपकडून उमेदवारी मिळणार?
आगामी लोकसभा निवडणूकीसाठी अमरावती मतदारसंघातून नवनीत राणा यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचं मानलं जात आहे. मात्र, महायुतीत असणारा प्रहार पक्ष नवनीत राणा यांच्या उमेदवारीच्या विरोधात आहे. प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे अमरावतीतून प्रहार पक्ष वेगळा उमेदवार देणार असल्याची घोषण बच्चू कडू यांनी केली.
नवनीत राणांची उमेदवारी मान्य नाही : बच्चू कडू
नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या स्वभाव कार्यकर्त्यांना मान्य नाही. नवनीत राणा आणि रवी राणा कार्यकर्त्यांना धमकावतात, त्यांनी वारंवार आमच्यावर आरोप केले. त्यामुळे कार्यकर्त्ये त्यांचा प्रचार करण्यासाठी तयार नाहीत, त्यामुळे महायुतीकडून नवनीत राणांची उमेदवारी मान्य नसल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं.
नवनीत राणा आणि रवी राणा धमक्या देत असल्याचा आरोप
नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या स्वभाव आम्हाला पटत नाही, ते नेहमी धमक्या देतात. त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केलेलं नाही. आमदार बच्चू कडू विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतात, तसे खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत शेतकऱ्यांचा एकही प्रश्न मांडलेला नाही, असा आरोप प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
यामुळे बच्चू कडू आणि नवनीत राणा यांच्यातील वाद पुन्हा एकदा विकोपाला गेल्याचं दिसत आहे. यामुळे या वादावर तोडगा काढत बच्चू कडू यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार बच्चू कडू यांना आज चर्चेसाठी बोलावलं आहे. आता मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीनंतर आमदार बच्चू कडू काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :