नागपूर: आगामी लोकसभा निवडणुकीत पूर्व विदर्भातील सर्व मतदारसंघांमध्ये भाजपला विजय मिळेल, असा छातीठोक दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( यांनी केला. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील जागांवर निवडणूक होत आहे. याठिकाणी भाजपसाठी अनुकूल वातावरण दिसत आहे. पंतप्रधान मोदीजींच्या कामामुळे लोकांमध्ये सकारात्मकता दिसून येत आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात नितीन गडकरी यांच्यासारखा दिग्गज उमेदवार पुन्हा मैदानात उतरला आहे. त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की, गेले चार-पाच वर्षे आम्ही जी तयारी केली आहे, बुथपर्यंत तयारी केली आहे, शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला आहे, त्याआधारे आम्ही क्लीन स्वीप करु आणि पहिल्या टप्प्यातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकू, असा विश्वास  देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.


नाशिकमध्ये हेमंत गोडसेंच्या उमेदवारीवरुन वाद, भाजपचे नेते उपमुख्यमंत्र्यांना भेटले, फडणवीस म्हणाले...


नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या जागेसाठी भाजपचे शांतीगिरी महाराज इच्छूक होते. परंतु, शिंदे गटाने परस्पर नाशिकच्या जागेसाठी उमेदवार जाहीर केल्याने भाजपच्या गोटात नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी नाशिकमधील भाजपच्या प्रमुख नेत्यांनी मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या  बैठकीला आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, आमदार राहुल आहेर, दिनकर पाटील, केदार आहेर उपस्थित होते. या नाराजीनाट्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर फडणवीसांनी म्हटले की, नाशिकमधील भाजप नेत्यांचे शिष्टमंडळ मला आज भेटले. साहजिकच आमचा पक्ष तिथे मोठा आहे. आमचे तीन आमदार आहेत, 100 नगरसेवक त्या भागात आहे, बूथपर्यंत रचना आहे. त्यामुळे त्यांना असे वाटते की, लढायला मिळाले पाहिजे असं वाटणं स्वाभाविक आहे. निर्णय तिन्ही पक्षांना मिळून एकत्र घ्यावा लागतो. महायुतीत कधी पदरी पडते आणि कधी पडत नाही. त्यामुळे मी नाशिकमधील  तुमचा म्हणणं ऐकून निर्णय घेऊ. जो काही निर्णय होईल त्यानुसार सगळ्यांना काम करावे लागेल. कारण नरेंद्र मोदी यांना आपल्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले पाहायचे आहे, असे फडणवीसांनी म्हटले.


महादेव जानकर महायुतीमधूनच लढणार


यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महादेव जानकर यांच्या महायुतीमधील समावेशाबाबत भाष्य केले. जानकर हे आमच्या महायुतीत आले आहेत. त्यांना आम्ही लोकसभेची एक जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. ते परभणीतून लढणार की बारामतीमधून, हे लवकरच कळेल. महादेव जानकर हे आधीपासूनच महायुतीत होते. मध्यंतरीच्या काळात ते नाराज होते. पण आता ते पुन्हा महायुतीसोबत आले आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 


आणखी वाचा


मी पुन्हा अडीच वर्षांनी आलो, पण दोन पक्ष फोडून आलो, जगाला उत्तर द्यावं लागतं : देवेंद्र फडणवीस