Babanrao Taywade on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासारख्या वरिष्ठ ओबीसी नेत्याला मंत्रिमंडळात स्थान न मिळणे, हे दुर्दैवी असल्याचे वक्तव्य राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी केले आहे. तर छगन भुजबळांनी राजकीय दृष्टिकोनातून सक्रिय राहावं, ओबीसींच्या प्रश्नांवर त्यांची गरज आहे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसकडून नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात असून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासारख्या नेत्यांना डच्चू देण्यात आला. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज झाल्याची चर्चा कालपासून रंगली होती. काल नागपूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याकडे छगन भुजबळांनी पाठ फिरवली. तर आज माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी उघड नाराजी व्यक्त केली. 


भुजबळ टीकेचे धनी झाले


याबाबत बबनराव तायवाडे म्हणाले की, छगन भुजबळ यांच्या सारख्या वरिष्ठ ओबीसी नेत्याला मंत्रिमंडळात स्थान न मिळणे हे दुर्दैवी आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटील रोज छगन भुजबळ यांना टार्गेट करत असताना ओबीसींच्या संवैधानिक हक्काच्या रक्षणासाठी भुजबळांनी नेहमी भूमिका मांडली. त्यासाठी त्यांना टिकेचे धनी व्हावे लागले. त्यामुळे जर भुजबळांवर राजकीय अन्याय होत असेल तर हे दुर्दैवी आहे, असे त्यांनी म्हटले.  


भुजबळांनी राजकीय दृष्टिकोनातून सक्रिय राहावं


तर मराठा राजकारण साधण्यासाठी अजित पवारांनी राजकीय नफा तोटा लक्षात घेऊन भुजबळांना मंत्रिपदापासून दूर ठेवले आहे का? असे विचारले असता बबनराव तायवाडे म्हणाले की, त्यांच्या पक्षाने असा निर्णय का घेतला हे अजून स्पष्ट नाही. मात्र, भुजबळांनी राजकीय दृष्टिकोनातून सक्रिय राहावं, ओबीसींच्या प्रश्नांवर त्यांची गरज आहे, असे त्यांनी म्हटले. 


छगन भुजबळांनी राज्यसभेची ऑफर धुडकावली


दरम्यान, छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे. त्यांना राज्यसभेची ऑफर देण्यात आली. मात्र छगन भुजबळ यांनी राज्यसभेची ऑफर धुडकावून लावली आहे.  त्यांनी म्हटलंय की, मला सात-आठ दिवसांपूर्वी तुम्ही राज्यसभेवर जा, असे सांगण्यात आले. मला काही दिवसांपूर्वी राज्यसभेवर जायचं होतं. तेव्हा तुम्हाला येवल्यातून लढलं पाहिजे, असं सांगण्यात आले. तुम्ही लढाईत असला तर पार्टी जोमानं पुढं जाईल, असं सांगितलं गेलं. माझ्या येवला-लासलगाव मतदारसंघातील मतदारांच्या आशीर्वादने मी निवडून आलो. राज्यसभेवर ताबडतोब जाऊ शकत नाही. माझ्या मतदारसंघाच्या मतदारांबरोबर ती प्रतारणा ठरेल. येवल्याच्या मतदारांचा विश्वासघात ठरेल. मला ज्यांनी प्रेम दिलं त्यांच्याशी मी प्रतारणा करणार नाही, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. 


आणखी वाचा


नाराज भुजबळ नाशिकला परतले, मुनगंटीवार अनुपस्थित, तानाजी सावंत बॅग घेऊन पुण्यात; मंत्रिमंडळ विस्तारानंतर नेमकं काय काय घडलं?