Ashok Chavan Resigns: नवी दिल्ली : बिहारमध्ये सुरू असलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींदरम्यान महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Congress) मोठा भूकंप झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आमदारकी आणि काँग्रेस पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना पाठवलेल्या पत्रात अशोक चव्हाणांनी काँग्रेससोबतच विधानसभेच्या सदस्यपदाचाही राजीनामा दिला आहे. नाना पटोलेंना दिलेल्या पत्रात अशोक चव्हाणांनी पेनानं स्वतःच्या नावासमोर ‘माजी’ असं लिहिलं आहे.
दरम्यान, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. तसेच, राज्यातील भूकंपाचे धक्के थेट दिल्लीतील काँग्रेस पक्ष श्रेष्ठींना बसले आहेत. अशोक चव्हाण म्हणजे, काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते. महाराष्ट्रात काँग्रेस मोठी करण्यात आशोक चव्हाणांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकांपूर्वी अशोक चव्हाणांनी सोडलेल्या साथीमुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अशातच काँग्रेसला घरघर लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आधी काँग्रेस नेते आणि दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा, नंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी आणि त्यापाठोपाठ आता अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.
अशोक चव्हाणांच्या चव्हाणांच्या राजीनाम्यामागे 'ही' कारणं
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून अशोक चव्हाण हे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नाराज होते. त्यांना पक्षानं लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगितलं असल्याचं बोललं जात होतं. मात्र, अशोक चव्हाणांनी त्यासाठी स्पष्ट नकार दिल्याची माहिती मिळत आहे.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना विधानसभा अध्यक्ष पद काँग्रेसकडे होतं. त्यावेळी नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपद सोडलं होतं. नाना पटोलेंच्या या कृत्यामुळे अशोक चव्हाण संतापले होते. पुढ शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. अशोक चव्हाणांनी यासाठी नाना पटोले यांनाच दोषी धरलं होतं. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपद सोडल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं असं त्यांचं म्हणणं होतं.
अशोक चव्हाणांचा 2019 मध्ये लोकसभेत पराभव
प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण हे नांदेडमध्ये दोन तगडे उमेदवार. चव्हाणांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी चिखलीकर यांच्या रूपानं भाजपला लोकसभेचा उमेदवार मिळाला. 2019 ला चिखलीकर यांना भाजपनं मैदानात उतरवलं आणि अशोक चव्हाण यांच्यापुढे मोठं आव्हान उभं केलं. चिखलीकर यांनी 4 लाख 86 हजार मतं घेत विजय मिळवला आणि यात किंगमकेर ठरले ते वंचितचे उमेदवार, ज्यांनी 1 लाख 66 हजार मतं घेतली. तर अशोक चव्हाण यांना 4 लाख 46 हजार मतं मिळाली. अशोक चव्हाण यांचा हा लोकसभेतला हा दुसरा पराभव ठरला. याआधी डॉ. व्यंकटेश काबदे यांनी अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता. भाजपनं लोकसभेची जागा ही 2004 नंतर 2019 ला जिंकली होती.
नांदेडचा गड काँग्रेसच्या ताब्यात ठेवण्यात अशोक चव्हाणांची मोठी भूमिका
मराठवाड्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढत म्हणून आता नांदेड लोकसभेकडे (Nanded Lok Sabha Election) पाहिलं जातं. काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी केंद्रीय गृह मंत्री आणि माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा गड म्हणून ओळखला जाणारा जिल्हा म्हणजे नांदेड. पुढे अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी हा पूर्ण जिल्हा आपल्या हातात ठेवला, त्याच्यावर एकहाती वर्चस्व ठेवलं. काँग्रेससाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणून नांदेडकडे पाहिलं जातं. आतापर्यंत 17 पैकी 14 वेळा लोकसभेच नेतृत्व हे काँग्रेसकडे होते. मुख्यमंत्रीपदी विराजमन असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा ते विधानसभापर्यंत काँग्रेसला अच्छे दिन आणलेले.