Satyajeet Tambe : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसला पक्षाला राम राम केला आहे. यामुळे महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली असून काँग्रेसची अवस्था पाहून वेदना होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


सत्यजीत तांबे एक्सवर म्हणतात,


सत्यजीत तांबे यांनी एक्स या सोशल माध्यमावरून आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाची स्थिती पाहून मनाला खूप वेदना होत आहेत. ज्या संघटनेसाठी मी आयुष्याचे २२ वर्ष तन, मन, धनाने दिली, त्याची ही हालत पाहून अस्वस्थ झालो आहे. खूप काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही,असे सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे. त्यामुळे सत्यजीत तांबे यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? असा सवाल उपस्थित होत आहे. 


 






 


राजीनाम्यानंतर काय म्हणाले अशोक चव्हाण? 


अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले की, मी काँग्रेस (Congress) पक्षाच्या विधानसभा सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस वर्किंग कमिटी, प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. मी काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले आहे. माझी कोणाबद्दल वेगळी भावना नाही. जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. आता मी निर्णय घेईन, दिशा ठरवेन. एक दोन दिवसात राजकीय भूमिका ठरवेन. भाजपची कार्यप्रणाली मला माहिती नाही. मी अद्याप भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. दोन दिवसांमध्ये मी माझी राजकीय भूमिका स्पष्ट करेन, असे त्यांनी म्हटले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या