Ashok Chavan Resign :  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे काँग्रेसमध्येही  हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे दिल्लीला रवाना झाल्याचे वृत्त आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत काही आमदारही भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे नाना पटोले यांचा दौरा महत्त्वाचा असल्याचे म्हटले जात आहे. 


नाना पटोले दिल्लीला रवाना 


अशोक चव्हाण यांच्या संदर्भात सुरू असलेल्या घडामोडी संदर्भात दिल्लीत वरिष्ठांशी चर्चा करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. नाना पटोले हे रायपुरहून दिल्लीला जाणार आहेत. अशोक चव्हाण आणि त्यांच्यासोबत भाजपात जाणाऱ्या काही नेत्यांमुळे राज्यात किती फरक पडणार, राजकीय स्थिती काय असेल याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. 


वर्षभरापासून अशोक चव्हाण यांची भाजप प्रवेशाची चर्चा


वर्षभरापासून अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार, अशा चर्चा सुरू होत्या. स्वतः चव्हाण यांनी याचे अनेकदा खंडण केले होते. मात्र,आज आपल्या सर्व सचिवांसह अशोक चव्हाण नॉट रिचेबल असल्याचे वृत्त आहे. भाजपच्या एका बैठकीत बावनकुळे यांनी अशोक चव्हाण भाजपमध्ये येण्यास उत्सुक असल्याचे जाहीर भाषणात सांगितले होते. भारतीय जनता पक्षाचे नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनीही अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाविषयी जाहीर वक्तव्य केले होते. 


अशोक चव्हाण हे संस्थापक असलेल्या आणि त्यांच्या गटाची सत्ता असलेल्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या 147 कोटी रुपयांच्या कर्जाला शासनाने थकहमी दिली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती.


अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर प्रताप चिखलीकरांची पहिली प्रतिक्रिया


भाजपला कोणाचीही गरज नाही. पण ज्याला गरज आहे तो भाजपमध्ये येतो. अशोक चव्हाण भाजपमध्ये येण्याची अनेक कारणे असतील. त्याबाबत आत्ताच बोलता येणार नाही. अशोक चव्हाण यांच्या येण्याने लातूर आणि नांदेड, हिंगोलीत कोणताही फरक पडणार नाही. मी त्यांनी हरवून जिंकलो आहे. याठिकाणी भाजप अगोदरच बळकट आहे पण त्यांच्या येण्याने ही बळकटी आणखी वाढेल, असे प्रतापराव चिखलीकर पाटील यांनी म्हटले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :