छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसमधून भाजपात गेलल्या खासदार अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाचा भाजपला म्हणावा तसा फायदा झाला नाही. कारण, अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतरही लोकसभा निवडणुकीत भाजपला मराठवाड्यात मोठा फटका बसला. तर, नांदेड आणि लातूर येथील दोन्ही मतदारसंघात भाजपचा पराभव झाला आहे. तसेच, अशोक चव्हाण यांच्यासमवेत काही आमदारही भाजपात येणार असल्याची चर्चा होती, पण अद्यापही एकही आमदार भाजपात आला नसून लोकसभा निवडणुकांनंतर वातावरण आणखी बदललं आहे. त्यामुळे, भाजपामध्ये जाण्यासाठी घाई गडबड केली असं तुम्हाला वाटतं का, असा प्रश्न अशोक चव्हाण यांना विचारण्यात आला होता. त्यावर, मी राजकारणात अनेक चढ-उतार पाहिले आहेत, फायदा-नुकसानीची माझी स्टेज राहिला नाही, असे उत्तर अशोक चव्हाण यांनी दिले. 


अशोक चव्हाण यांनी एबीपी माझाशी एक्स्क्लुझिव्ह संवाद साधला, त्यावेळी मराठा आरक्षण, काँग्रेस प्रवेश, मनोज जरांगे पाटील आणि विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा केली. तसेच, विविध प्रश्नांवर उत्तरेही दिली. यावेळी, भाजपमधील प्रवेशाच्या अनुषंगाने त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावरही, चव्हाण यांनी उत्तर दिले. 


भाजपात जाण्याच्या निर्णयात गडबड झाली का?


भाजपमध्ये जाण्याचा निर्णयात गडबड झाली असं वाटतं का?, असा प्रश्न अशोक चव्हाण यांना विचारण्यात आला होता. त्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात विकसित भारताची भूमिका आहे. त्यासाठी हा निर्णय घेतला. राजकारणात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. हे माझ्यासाठी नवीन नाही, अनेकवेळा फायदा नुकसान झालं, पण फायदा नुकसानाचा विचार करण्याची माझी स्टेज निघून गेली आहे. कधी हरलो म्हणून घरी बसलो नाही, आणि जिंकलो म्हणून हळूहळू गेलो नाही. जो रस्त्या स्वीकारलाय, त्या रस्त्याने प्रामाणिकपणे जायचं काम करतोय, असे म्हणत अशोक चव्हाण यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. 


मराठवाड्यात भाजपा का हरली?


बूथ कमिटी पेक्षा लोकांना काय हवं आहे, असं केलं तर लोकांना अपील होईल. यापुढे भाजपाला जनमताचा कौल लक्षात ठेवून काम करणे गरजेचे आहे, असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले. 


लोकसभेप्रमाणे विधानसभेत बसेल का?


आता परिस्थिती बदलत जाते, एखाद्या विषयाची तीव्रता नेहमीच राहते असं नाही. महाराष्ट्रातील जनता एकदा सजा दिल्यानंतर दुसऱ्यांदा त्याच कारणास्तव सजा देईल असं वाटत नाही. आरक्षण मिळालं की लगेच नोकरी मिळेल असं नाही, त्यासाठी अभ्यास करावा लागेल. जरांगे यांना मी जाहीरपणे भेटतो, संवाद ऐकला जातो तो कोट केला जातो त्यांची भेट जाहीर होते लपून-छपून करत नाही. मी त्यांचे कौतुक करतो, मला त्यांचा अभिमान आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी त्यांचं मोठं योगदान आणि पाठपुरावा आहे. त्यामुळे, लोकांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी आदर आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना कोणात्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिलं आहे, असेही चव्हाण यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना म्हटले.