Rahul Mote on Tanaji Sawant, Paranda : "आरोग्य खात्याचं मंत्रिपद तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्याकडे आहे. परंतु तुम्ही आजारी पडल्यानंतर आपण केलेल्या रुग्णालयात उपचार घेता की तानाजी सावंतांनी केलेल्या रुग्णालयात उपचार घेता. त्यांचा दवाखाना आपण बघितला तरी आहे का? प्रत्येक वेळेस आल्यानंतर 100 खाटांचा दवाखाना केला, असं सांगतात. परंतु हे सर्व दवाखाने कागदावर आहेत. कारण पाच वर्षांची संधी तुम्हाला जनतेने दिलेली होती. त्या संधीचा तु्म्ही फायदा घेतला नाही. तीन वर्ष मंत्रिपद मिळालं नाही म्हणून पुण्याला जाऊन रुसून बसलात. तुम्हाला लोकांना काम करण्यासाठी निवडून दिलं होतं. पण मंत्रिपद मिळालं नाही म्हणून तु्म्ही तीन वर्षे पुण्याला जाऊन बसलात. कोरोना काळात मी मतदारसंघात असायचो ते पुण्याला जाऊन बसायचे. आपण 15 वर्ष काम केलं. लोकांना आपल्याला आशीर्वाद दिला. लोकांना वाटलं 15 झालं आता दुसऱ्याला संधी देऊन बघू", असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार राहुल मोटे (Rahul Mote) म्हणाले. राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा परांडा (Paranda) शहरात आली होती. यावेळी ते बोलत होते.


देवाच्या नावावर पैसे खाणाऱ्या माणसावरही आपण बोलू


राहुल मोटे म्हणाले, निवडणूक लागल्यानंतर आपण तानाजी सावंतांवर बोलणारच आहोत. त्यांच्या सर्व गोष्टी आपण काढणार आहोत. रुग्णवाहिकेत 6 हजार कोटींचा घोटाळा, आरोग्य खात्याचा दोन हजार कोटींचा घोटाळा, कंत्राटी कामगारांमध्ये घोटाळा एवढेच नाही तर पंढरपूरमध्ये वारकऱ्यांच्या तपासणीच्या नावावर आणि देवाच्या नावावर पैसे खाणाऱ्या माणसावरही आपण बोलू. तानाजी सावंतांना खालच्या पातळीवर जात टीका करण्याची सवय आहे, आपल्यावर ते संस्कार नाहीत. 


आमदार असताना माझं वय कमी होतं, त्यावेळी ज्येष्ठ लोकांनी मला सांभाळून घेतलं


माझे वडील कैलासवासी मोठे बप्पा हे 1985 साली परांडा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले. त्यावेळी एस काँग्रेसच्या आणि पवार साहेबांच्या माध्यमातून त्यांनी नेतृत्व केलं. त्यानंतर दुसऱ्या वेळीही त्यांना संधी दिली. 1995 साली त्यांचं निधन झालं. त्यावेळी मी कॉलेजला होतो. त्यांचं निधन झाल्यानंतर मला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात यावं लागलं. 10 वर्ष मी सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करत होतो. वयाच्या 28 व्या वर्षी मला शरद पवारांनी उमेदवारी दिली आणि जनतेने मला आशीर्वाद दिला. त्यामुळे 2004 साली मी आमदार होऊ शकलो. आमदार असताना माझं वय कमी होतं. त्यावेळी ज्येष्ठ लोकांनी मला सांभाळून घेतलं, असंही राहुल मोटे यांनी सांगितलं. 


पुढे बोलताना राहुल मोटे म्हणाले, तरुणांना एकत्रित करुन आपण राजकारण केलं. सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन राजकारण केलं. त्यामुळे मी तीन वेळेस निवडून आलो. शिराळा उपसा सिंचन पूर्ण केला. 10 ते 15 स्टोरेज टँक त्याकाळामध्ये पूर्ण केले. शासकीय इमारतींचे देखील त्याकाळी आपण काम केलं. या पाच वर्षांमध्ये आपल्या मतदारसंघात एकतरी नवीन पाझर तलाव, स्टोरेज टँक झालाय का? झालेला असेल तर मला सांगा. एकतरी प्रशासकीय इमारत झाली का? असा सवालही राहुल मोटे म्हणाले.