Nagpur News नागपूर : नागपूरच्या अंबाझरी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची पुनर्बांधणी करण्यासाठी राज्य सरकारने देऊ केलेल्या 10 कोटी रुपयांतून लवकरात लवकर सांस्कृतिक भवन उभारावं, अशी मागणी काँग्रेस आमदार विकास ठाकरे (Vikas Thakre) यांनी केली आहे. तसेच ज्या खाजगी कंपनीने नियमबाह्य पद्धतीने जुने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन (Dr. Babasaheb Ambedkar Cultural Bhavan) पाडलं होतं, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून हे दहा कोटी रुपये वसूल करण्यात यावे, अशी मागणी ही विकास ठाकरे यांनी केलीय. 


दोषींकडून दहा कोटी रुपये वसूल करण्याची मागणी 


मुळातच महापालिकेच्या मालकीची कुठलीही इमारत पाडायची असेल, तर त्यासाठी महापालिकेच्या सभागृहाची तसेच शासनाची परवानगी लागते. मात्र, तेव्हा बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या बाबतीत खाजगी कंपनीने या नियमांचे पालन केले नव्हते. त्यामुळेच त्या खाजगी कंपनीवर गुन्हे दाखल झाले होते. आता जनतेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुन्हा उभारण्याची मागणी होत असताना, राज्य सरकारने ती मागणी पूर्ण केली आहे आणि त्यासाठी शासनाने दहा कोटी मंजूर ही केले आहे. त्यामुळे त्या निधीतून लवकरात लवकर हे भवन उभारावे आणि ज्या खाजगी कंपनीने नियमबाह्य पद्धतीने जुने सांस्कृतिक भवन पाडले होते. त्यांच्याकडून ते दहा कोटी रुपये वसूल करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी केली आहे.


नागपूरसाठी एक नवा मास्टर प्लॅन तयार करावा- विकास ठाकरे


दुसरीकडे, नागपुरातील अनियोजित विकास कामे आणि चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांच्या विरोधात आता काँग्रेस (Congress) पक्षानेही उडी घेतली आहे. मोठा पाऊस होऊनही दहा वर्षांपूर्वीपर्यंत नागपूर शहरात कधीही पूरसदृश्य स्थिती निर्माण होत नव्हती. मात्र गेले दहा वर्ष सातत्याने नागपूरकरांना शहरात पूरसदृश्य स्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनियोजित पद्धतीने होणारे विकास काम, तसेच अत्यंत उंच बांधल्या जाणाऱ्या सिमेंट रोड त्यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. गेल्या काही वर्षात नागपुरात बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांची तसेच अनयोजित विकास कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ही काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे. राज्य सरकार आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी सर्व परिस्थिती लक्षात घेऊन नागपूरसाठी एक नवा मास्टर प्लॅन तयार करावा.


तसेच स्टॉर्म वॉटर ड्रेनेज सिस्टीम मधील उणिवा दुरुस्त कराव्या, अशी मागणी ही विकास ठाकरे यांनी केली आहे. विशेष म्हणजे नागपुरात वारंवार उद्भवणाऱ्या पूर परिस्थिती संदर्भात नागरिकांच्या मदतीने सिटीजन पीटिशन करण्याची तयारी ही काँग्रेसने सुरू केली आहे. त्यासाठी नागरिकांनी 0712-7191232 या नंबर वर मिस्ड कॉल द्यावे, असे आवाहनही काँग्रेस पक्षाकडून करण्यात आले आहे.


हे ही वाचा