Gujarat Assembly Elections 2022: गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष चांगलाच सक्रिय झाला आहे. आप अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री हे गुजरातमधील विविध भागात सभा घेत असून ते लोकांशी संवादही साधत आहे. अशातच प्रचारासाठी निघालेले अरविंद केजरीवाल रिक्षाने जात असताना पोलिसांशी त्यांची वादावादी झाली. अरविंद केरीवाल हे अहमदाबादमध्ये एका रिक्षात बसून रिक्षा चालकाच्या घरी जेवणासाठी जात होते. मात्र सुरक्षेचे कारण देत पोलिसांनी त्यांना थांबवले. यादरम्यान त्यांची पोलिसांशी वादावादी झाली. या घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. जयंत केजरीवाल पोलिसांना बोलताना दिसत आहे की, ''तुम्ही मला कैद करत आहेत. मी सर्वसामान्यांचा माणूस आहे. मला तुमची सुरक्षा नको.''
केजरीवाल पोलिसांना म्हणाले की, ''तुम्ही मला काय सुरक्षा द्याल. मला सुरक्षा देऊ शकत नाही, असं बोलणं ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे.'' यादरम्यान पोलिस अधिकारी म्हणतात की, हा प्रोटोकॉल आहे. यावर केजरीवाल म्हणाले की, ''आम्हाला तुमचा प्रोटोकॉल आणि तुमची सुरक्षा नको आहे. तुम्ही मला सार्वजनिक ठिकाणी जाण्यापासून रोखू शकत नाही. मला तुमचे संरक्षण नको आहे. तुम्ही मला जबरदस्ती सुरक्षा देऊ शकता नाही. तुम्ही मला अटक ही करू शकत नाही.'' यानंतर केजरीवाल रिक्षाचालकाच्या घरी गेले आणि त्यांनी तिथे जेवण ही केलं.
आप नेत्यांचा भाजपवर निशाणा
केजरीवाल यांना रोखण्यासाठी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, भाजपचे लोक जनतेच्या नेत्याला जनतेत जाण्यापासून रोखत आहेत. केजरीवाल यांना रिक्षामध्ये बसण्यापासून रोखल्यावर आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह म्हणाले, ही कसली दादागिरी? तीन वेळा निवडून आलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना रिक्षाचालकाच्या घरी जाऊ दिले जात नाही. ही त्यांची हतबलता दिसत आहे, गुजरातमध्ये भाजपचा पराभव होत आहे.