Anil Deshmukh Attack Update : अनिल देशमुख यांच्या वरील कथित दगडफेकीच्या हल्ल्याच्या काही मिनिटानंतर अनिल देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा काटोलचे भाजप उमेदवाराच्या भावासोबत आणखी एक वाद झाला होता. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 18 नोव्हेंबर रोजी काटोल जवळ अनिल देशमुख यांच्यावर आणि त्यांच्या वाहनावर झालेल्या हल्ला प्रकरणी पोलीस तपासात आता नवे खुलासे समोर आले आहे.
गाडी बाजूला घ्यावी, या मुद्द्यावरून वाद?
अनिल देशमुख यांनी त्यांच्यावर आणि वाहनावर झालेल्या दगडफेक प्रकरणी पोलिसांना बयान दिले असून त्या बयानात खळबळजनक दावा केला आहे. अनिल देशमुख यांनी पोलिसांना सांगितले आहे की दगडफेकीच्या कथित घटनेच्या काही वेळानंतर जेव्हा अनिल देशमुख आपल्यावर हल्ला झालेल्या वाहन घटनास्थळीच सोडून एका इनोव्हा मध्ये काटोलच्या रुग्णालयाच्या दिशेने निघाले होते. तेव्हा घटनास्थळावरून काही अंतरावर असलेल्या एका रेल्वे क्रॉसिंग जवळ काटोल मतदारसंघातील भाजप उमेदवार आणि विद्यमान आमदार चरणसिंह ठाकूर यांचे बंधू राजा ठाकूरसह त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत अनिल देशमुख आणि सोबतच्या कार्यकर्त्यांचे जोरदार वाद झाला होता. रेल्वे क्रॉसिंगवर उभी असलेली राजा ठाकूर यांची गाडी त्यांनी बाजूला घ्यावी, या मुद्द्यावरून हा वाद झाला असल्याचे आता तपासात पुढे आले आहे.
पोलिसांना दिलेल्या बयानात अनिल देशमुख यांच्या या दाव्यानंतर असा संशय निर्माण झाला होता की, अनिल देशमुख यांच्यावर ज्या वेळेस दगडफेकीचा कथित हल्ला झाला, तेव्हा भाजप उमेदवार यांचे बंधू राजा ठाकूर त्यांच्या कार्यकर्त्यांसह हल्ला झालेल्या भागातच उपस्थित होते की काय?
दरम्यान, अनिल देशमुख यांनी हा नवा खुलासा केल्यानंतर पोलिसांनी ही तातडीने या प्रकरणी राजा ठाकूर यांची चौकशी केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. राजा ठाकुर यांनी ही या संदर्भात पोलिसांकडे बयान दिले असून त्यांच्या बयानात घटनेच्या दिवशीची जी वेळ अनिल देशमुख सांगत आहेत, त्यावेळी मी (राजा ठाकूर) त्या परिसरातच उपस्थित नव्हतो, त्या वेळी मी काटोल तालुक्यात दुसऱ्या परिसरात होतो, असा दावा पोलिसांना दिलेल्या बयानात केला आहे.
तपासासाठी तांत्रिक पुरावे, फॉरेन्सिक टीमची ही मदत
यासंदर्भात पोलीस काही तांत्रिक पुरावे (cctv ) तपासून पाहत आहे. अनिल देशमुख यांनी राजा ठाकूर यांच्यासोबत वाद झाल्या संदर्भात जे स्थान आणि वेळ सांगितली आहे, त्या वेळेवर खरंच राजा ठाकूर त्या भागात होते की नाही? याचा तपास तांत्रिक पुरावांच्या आधारे पोलीस करत आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात ज्या पद्धतीने अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची तक्रार करण्यात आली होती. ती खरंच शक्य आहे की नाही, हे तपासण्यासाठी फॉरेन्सिक टीमची ही मदत घेतली आहे. फॉरेन्सिक टीम या संदर्भात सखोल तपास करत आहे. त्या अहवालानंतर याप्रकरणी आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा