Anant Radhika Wedding Guest: अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) आज विवाहबंधनात अडकणार आहेत. या लग्नाला देशातील अनेक मोठे राजकारणी येणार आहेत. या मालिकेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही या लग्नात सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाल्या आहेत. ममता बॅनर्जी अनेकदा असेल कौटुंबिक कार्यक्रम टाळत असल्याचं पाहायला मिळतं. तरीदेखील अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याला मात्र, त्यांनी आवर्जुन हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक चर्चा रंगल्या आहेत. अशातच ममता बॅनर्जींनी याबाबत स्वतः खुलासा केला आहे. नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांनी वारंवार विनंती केल्यामुळे मी लग्नसोहळ्याला उपस्थिती राहणार आहे, असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.
"वारंवार विनंती केली, आग्रहाचं आमंत्रण दिलं, त्यामुळेच..." : ममता बॅनर्जी
मुंबईला रवाना होण्यापूर्वी कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर ममता बॅनर्जी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताला. त्यावेळी माध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "लग्नाला उपस्थित राहण्याचा त्यांचा कोणताही विचार नसला तरी अंबानी कुटुंबीयांनी आग्रहाचं निमंत्रण दिलं, वारंवार विनंती केली. त्यामुळेच मी लग्नसोहळ्यासाठी आवर्जुन उपस्थित राहण्याचं ठरवलं. त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, "मुकेश अंबानी आणि नीता अंबानी मला सतत लग्न समारंभाला येण्याची विनंती करत होते, त्यामुळेच मी मुंबईला जात आहे."
ममता बॅनर्जींची अंबानींच्या लग्नसोहळ्याला विनंती, पण त्यासोबतच राजकीय गाठीभेटी
मुंबईत पोहोचल्यानंतर ममता बॅनर्जी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद चंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार आहेत. खुद्द ममता बॅनर्जी यांनी या दोन्ही नेत्यांच्या भेटीला दुजोरा देत "मी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेऊन राजकारणावर चर्चा करेन", असं सांगितलं.
'हे' राजकीय दिग्गजही सहभागी होणार
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण, आंध्र प्रदेशचे मंत्री नारा लोकेश आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्यासह अनेक राजकीय दिग्गजही उपस्थित राहणार आहेत.
देश-विदेशातील दिग्गजांची उपस्थिती
अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नात सहभागी होण्यासाठी परदेशी पाहुणेही मुंबईत पोहोचले आहेत. हाय-प्रोफाइल पाहुण्यांच्या यादीत पॉप सिंगर रिहाना, जस्टिन बीबर, टेक दिग्गज बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, माजी ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि टोनी ब्लेअर आणि अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांचाही समावेश आहे.
पंतप्रधान मोदीही उपस्थित राहणार का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लग्नाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यावर अजूनही सस्पेंस कायम आहे. वृत्तानुसार, शनिवारी पीएम मोदी मुंबईत अनेक प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि देशातील या हाय-प्रोफाइल लग्नाला ते पाहुणे म्हणून उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.