Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी (Nashik Lok Sabha Constituency) शिवसेना ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र महायुतीत (Mahayuti Seat Sharing) नाशिक लोकसभेचा तिढा कायम आहे.
महायुतीचे तीनही पक्ष या जागेसाठी आग्रही आहेत. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी पुन्हा एकदा उमेदवारीसाठी जोर लावलाय. मात्र ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे नाशिक लोकसभेसाठी आग्रही असून आज त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाशिकच्या जागेचा तिढा आज सुटणार?
राज्यात महायुतीत अनेक जागांचा तिढा अद्याप कायम असून नाशिकची उमेदवारी नक्की कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी नाशिक येथे झालेल्या मेळाव्यात हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. मात्र श्रीकांत शिंदेंच्या घोषणेला महायुतीतून जोरदार विरोध करण्यात आला. त्यानंतर नाशिक भाजपने (BJP) आक्रमक होत भाजपची नाशिकमध्ये अधिक ताकद असल्याने ही जागा आम्हालाच सुटावी, अशी मागणी केली. नाशिकचा जागेवरून भाजप-शिवसेनेत जुंपलेली असतानाच राष्ट्रवादी अजित पवार गटाने (NCP Ajit Pawar Faction) यात उडी घेतली होती. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माझे नाव दिल्लीतून चर्चेत आल्याचे म्हणत नाशिक लोकसभेसाठी शड्डू ठोकला होता. मात्र आता आजच नाशिकच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुनील तटकरे भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब करणार?
आज राष्ट्रवादी अजित पवार गटाची पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती मिळत आहे. यात अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) छगन भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता वातावली जात आहे. शिवसेनेमुळे नाशिकची उमेदवारी जाहीर करण्यास उशीर होत असल्याचे सूत्रांकडून समजते. मात्र आजच सुनील तटकरे छगन भुजबळांची उमेदवारी जाहीर करणार असल्याचे बोलले जात आहे. जर आज राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांची उमेदवारी जाहीर झाली तर शिवसेनेचे हेमंत गोडसे काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा