Nandurbar : ज्या आमदारासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जीवाचं रान केलं, तेच आमदार आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी (Aamshya Padavi) हे कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. आमश्या पाडवी दोन दिवसात शिंदे गटात होणार सामील होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


कोण आहेत आमश्या पाडवी?


आमश्य पाडवी हा शिवसेनेचा नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील आदिवासी चेहरा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत आहेत. नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना पक्ष रुजवण्यात त्यांनी परिश्रम घेतले होते.  2022 साली झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी पक्षातील अनेक बड्या नेत्यांना बाजूला सारत आमशा पाडवी (Aamshya Padavi) यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली होती. त्यामुळे पक्षातील इतर सहकारी त्यांच्यावर नाराज देखील झाले होते. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर 40 आमदार त्यांच्यसोबत गेले. मात्र, पाडवी ठाकरेंच्या बाजूने उभे राहिले होते. मात्र, आता त्यांच्या देखील शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 


विधानसभा निवडणुकीत दोन वेळेस पराभव 


आमश्या पाडवी (Aamshya Padavi) यांनी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून 2014 आणि 2019 मध्ये आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. दोन्ही वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमशा पाडवी यांनी 80,777 मते घेतली होती.


अंबादास दानवेंच्याही चर्चा 


विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र, आज सकाळी त्यांनी शिंदे गटातील प्रवेशाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मी शिंदे गटात गेलो तर आई मला घरात प्रवेश देणार नाही, अशी भूमिका अंबादास दानवे यांनी मांडली आहे. त्यामुळे एकप्रकारे दानवेंच्या प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळालाय. 


रवींद्र वायकर यांनी केलाय शिंदे गटात प्रवेश 


ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या मागे जवळपास दोन महिने ईडीचा ससेमिरा होता. दरम्यान, त्यावेळी मी उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून कदापी जाणार नाही, अशी भूमिका रवींद्र वायकर यांनी मांडली होती. मात्र, शेवटी त्यांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. सुरुवातील ठाकरेंना सोडून जाणार नाही, अशी भूमिका मांडणाऱ्या अनेक नेत्यांनी शेवटी शिंदे गटात प्रवेश केल्याचे अनेक दाखले आहेत. त्यामुळे अमिश्या पाडवी आगामी काळात शिंदे गटात जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या रणधुमाळीला सुरुवात! 19 एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीला सुरुवात; मतदानाचं संपूर्ण वेळापत्रक पाहा एका क्लिकवर...