पुणे : माझ्यासारख्या कार्यकर्त्याने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, बिबट्यांचा शेतकऱ्यांना होणारा त्रास यावर आवाज उठवला, ही चूक केली का? असा सवाल विचारत डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) आव्हान दिलंय. माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला पाडण्याची भाषा करणाऱ्या अजित पवारांना जर मर्दुमकी दाखवायची असेल तर ती दिल्लीत दाखवावी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत असं अमोल कोल्हे म्हणाले. सर्वांना आव्हान द्या, पण बापाला आव्हान द्यायचं नसतं असा टोलाही त्यांनी लगावला. जुन्नरमधील जाहीर सभेत ते बोलत होते.


राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार जुन्नरमध्ये आले होते. त्यावेळी अमोल कोल्हे यांनी अजित पवार आणि केद्रातील मोदी सरकार यांच्यावर जोरदार टीका केली. 


स्वाभिमान गहाण ठेवला नाही ही चूक केली का? 


अजित पवारांनी केलेल्या टीकेवर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, "उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले अमोल कोल्हेला पाडूनच दाखवतो. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला प्रश्न पडला मी काय चूक केली? शेतकऱ्यांचे, जनतेचे प्रश्न मांडले ही चूक केली? की स्वाभिमान गहाण ठेवला नाही ही चूक केली? तुम्हाला मर्दुमकी दाखवायची असेल तर दिल्लीत जाऊन दाखवा. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा, बिबट्याच्या त्रासापासून त्यांना मुक्त करा. मात्र पाडापाडी आणि दमदाटी इतकंच सुरू आहे. काहीही झालं तरी आमचा स्वाभिमान कधीच झुकणार नाही."


शेतकऱ्याच्या प्रश्नांवर आढळराव बोलणार नाहीत


अमोल कोल्हे म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी काल पुण्यात आले होते. या सभेत मोदी यायच्या आधी शिरूरचे अधिकृत उमेदवार शिवाजी आढळराव यांना फक्त साडेतीन मिनिटं देण्यात आली. यातही त्यांनी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात, यावर भाष्य केलं. शेतकरी धोरणाचे विरोधी उमेदवार कौतुक करतात. मात्र शेतकऱ्यांच्या पिकाला मिळणारा भाव, दुधाचे दर, कांदा निर्यात, टोमॅटो याबद्दल ते बोलले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही कांदा निर्यातीबद्दल बोलले नाहीत. दहा वर्षात ते पुण्यात अनेकदा आले, मात्र एकदा ही शिवजन्मभूमी आले नाहीत. त्यांना इथं येऊन नतमस्तक व्हावंसं वाटलं नाही."


आमचा आत्मा पक्ष फोडणारा नाही


नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, "नरेंद्र मोदींनी शरद पवारांना भटकती आत्मा असं म्हटलं. होय, आमचे साहेब आत्मा आहेत, ते जनतेचा आत्मा आहेत. वाजपेयींच्या सत्ताकाळात भूकंपग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी हाच आत्मा पुढं आला होता. हा आत्मा शेतकऱ्यांच्या बांधावर, तरुणांना न्याय देण्यासाठी भटकतो. याला आम्ही पवित्र मानतो. आम्ही आमच्या आत्म्याला जपतो आणि कायम जपणार आहोत. आमचा आत्मा पक्ष, घरं फोडत नाही."


ही विचारांची लढाई


अमोल कोल्हे म्हणाले की, अमोल कोल्हे लढायला तयार नव्हता, मग अचानक कसा तयार झाला असं अजितदादा सर्वत्र म्हणतात. मात्र दादा, ही विचारांची लढाई आहे, त्यामुळे मी ताठ मानेने जगायचं अन लढायचं ठरवलं. महाराजांचे विचार आहेत, लढणाऱ्यांमध्ये सहभागी व्हा. इतिहास तेव्हाच घडतं.


ही बातमी वाचा: