मुंबई : भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर होते. मुंबई दौऱ्याचा समारोप होण्यापूर्वी अमित शाह यांनी मुंबई विमानतळावर महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार, प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे उपस्थित होते. महाराष्ट्र भाजपकडून देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत महायुतीमधील मित्र पक्षांच्या नेत्यांना जागावाटपात सन्मानजनक जागा देण्याचा शब्द दिला आहे, असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


महायुतीच्या बैठकीत काय घडलं?


अमित शाह यांनी महायुतीच्या जागा वाटपामध्ये प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल याची खात्री दिली. महायुतीतील इतर घटक पक्षांच्या नेत्यांना अमित शाह यांनी जागा वाटपाबाबत शब्द दिला आहे. याशिवाय  ज्या जागा निवडून येतील त्याचा लवकरात लवकर आढावा घेऊन एकत्रित बैठक करण्याच्या सूचना देखील अमित शाह यांनी दिल्या आहेत. 


महायुतीची पुढील बैठक दिल्लीत


महायुतीमधील जागा वाटपासंदर्भात अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. अमित शाह यांच्यासोबत आज झालेल्या बैठकीनंतर महायुतीच्या नेत्यांची पुढील बैठक दिल्लीत पार पडणार आहे. महायुतीच्या जागाटपाबाबत अंतिम चर्चा दिल्लीत होऊ शकते. महायुतीच्या नेत्यांची मुंबई येथील बैठक जवळपास 45 मिनिटं सुरु होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 


अमित शाहांकडून महायुतीच्या नेत्यांना सूचना


महायुतीला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपयश मिळालं होतं. लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी करु नयेत अशा सूचना देखील अमित शाह यांनी दिल्याची सूत्रांची माहिती आहे. 


महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येऊ नये, जाहीर वाद टाळावेत, अशा सूचना अमित शाह यांनी दिल्या आहेत.  महायुतीच्या नेत्यांनी संयम ठेवावा आणि एकजूट असल्याचे चित्र जनतेसमोर जाईल, याची काळजी घ्यावी असं देखील ते म्हणाले. जिंकून येण्याची क्षमता असलेले योग्य उमेदवार निश्चित करावेत आणि विरोधकांच्या फेक नरेटिव्हला उत्तर द्या, अशा सूचना देखील अमित शाह यांनी दिल्या.  भाजप नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत भाजपच्या अंतर्गत सर्व्हेवर अमित शाह यांनी लक्ष वेधले असल्याची माहिती आहे. शाह यांनी राज्य सरकारने घेतलेले निर्णय जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचवण्याचे भाजप नेत्यांना आदेश दिले आहेत.  भाजपच्या काही आमदारांची कामगिरी  समाधानकारक नाही  जागा बाबत योग्य निर्णय घ्या, अशा सूचना देखील अमित शाह यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिल्या आहेत. 


इतर बातम्या : 


Mahayuti : अमित शाहांच्या उपस्थितीत महायुतीचे राजकीय खलबतं; जागा वाटपावर आज शिक्कामोर्तब होणार?


Ajit Pawar: आधी गैरहजेरीवरुन उलटसुलट चर्चांना उधाण, नंतर अजितदादांनी अमित शाहांच्या भेटीसाठी थेट एअरपोर्ट गाठलं