मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यापासून मंत्रिपद न मिळाल्यामुळे अनेक नेते नाराज आहेत. महायुतीतील तिन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांना यावेळी मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलंय. याच कारणामुळे महायुतीच्या तिन्ही पक्षात अंतर्गत धुसफूस चालू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माजी मंत्री तथा आमदार छगन भुजबळ यांनी तर आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. फडणवीसांची भेट घेतल्यानंतर ते लवकरच भाजपात जातात की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे. असे असतानाच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मोठं भाकित केलंय.
अंजली दमानिया जे बोलल्या ते योग्य बोलल्या
अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील राजकीय, सामाजिक परिस्थितीवरून राज्य सरकारला घेरलं. त्यांनी छगन भुजबळ यांच्या नाराजीवरही भाष्य केलं. त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या शक्यतेवर बोलताना दानवे म्हणाले की, काहीही होऊ शकते. ज्या पद्धतीने भुजबळ व्यक्त होत आहेत ते पाहता अजित पवार यांच्यासोबत राहतील असे वाटत नाही, असे भाकित त्यांनी व्यक्त केले. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भुजबळ यांची भेट होत नाही पण भुजबळ आणि फडणवीस यांची भेट मात्र होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया जे बोलल्या आहेत, ते बरोबर आहे, असंही दानवे म्हणाले.
हालहाल करून संतोष देशमुख यांचा खून
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणावरही दानवे यांनी सरकारवर टीका केली. बीड प्रकरणात आरोपी सरकाला सापडत नाहीये. सरकार गंभीर पावलं उचलत नाहीये. संतोष देशमुख यांना हालहाल करून त्यांचा खून करण्यात आला. आरोपी आणि पोलीस यांचे व्हिडीओ समोर आले होते. बीड जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर आहे, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे दोषी आहेत, त्यांना सोडलं जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
हेही वाचा :