मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे हे इव्हेंट सेलिब्रिटी आहेत. सभेतील मुख्य वक्त्यांच्या भाषणापूर्वी लोकांचा टाईमपास आणि करमणुकीचे काम ते करतात. ते भाजपने दिलेल्या स्क्रिप्टनुसार आपली भूमिका पार पाडत आहेत, अशी बोचरी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadditwar) यांनी केली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) एका इव्हेंटसाठी किती दर घेतात, याची माहिती काढली पाहिजे. राज ठाकरेंचा पिक्चर आणि सिरीयल चालत नाही. त्यामुळे ते इतरांच्या व्यासपीठावर जाऊन काम करतात, असे वडेट्टीवार यांनी म्हटले. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी विजय वडेट्टीवार यांनी महायुतीच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या सभांच्या मुद्द्यावरुन जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. राज ठाकरे भाजपच्या स्क्रिप्टनुसार काम करत आहेत. राज ठाकरे यांना वरुन सांगण्यात आलं असेल की, 'बेटा राज देख लो! ये फाईल देख लो'. या फाईल्सचा धसका घेऊनच राज ठाकरे महायुतीच्या मंचावर प्रचारासाठी जात असतील, अशी टिप्पणी विजय वडेट्टीवार यांनी केली. मुंबईतील सभेसाठी भाजपने त्यांना मोठी बिदागी दिली असेल. आम्हीसुद्धा असे सेलिब्रिटी आणतो. त्यांचे विमानाचे तिकीट काढतो आणि पैसे देतो. पण भूमिका बदलणाऱ्याला जनता कधीही साथ देत नाही, असे वडेट्टीवार यांनी म्हटले.
महाविकास आघाडीला राज्यात किती जागा मिळणार?
लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पार पडले आहेत. महाविकास आघाडी महाराष्ट्रात 35 जागा जिंकेल. त्यामुळे मोदी आणि भाजप घाबरलेले दिसत आहेत. आज मुंबईत रोड शो होतोय आणि राज्यात २४ वी सभा घेतली जात आहे. जिल्हा परिषदेला सुद्धा नेता एवढ्या सभा घेत नाही, तेवढ्या सभा या राज्यात मोदी घेत आहेत. यामधून त्यांना राहुल गांधींविषयी असणारी भीती दिसत आहे, असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला.
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक सुरु आहे. आज नाशिकमध्ये मोदींची सभाही आहे. पण त्यांनी अद्याप कांद्याच्या प्रश्नावर ब्र सुद्ध काढलेला नाही. तसेच आज मुंबईतही मोदींचा रोड शो आहे. दोन दिवसांपूर्वी घाटकोपरमध्ये दुर्घटना झाली, त्यामध्ये 18 जणांचा बळी गेला. सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे बळी गेले आहेत. जी क्रेन घटनास्थळी लवकर जायचा हवी होती, ती काल पोहोचली. ही दुर्घटना घडली त्यापासूनच काही अंतरावरच मोदींची रॅली निघत आहे. तुम्ही त्यांच्या मृतदेहवरून रॅली काढताय का? खरंतर भाजपने हा रोड शो रद्द करायला पाहिजे होता. पण हा रोड शो करुन भाजपला आनंद मिळत असेल तर त्यांच्या संवेदना मेल्या आहेत, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
आणखी वाचा
राज ठाकरे म्हणाले, दादांनी कधी जातीचं राजकारण केलं नाही, आता अजित पवार म्हणतात...