मुंबई :  पावसाळी अधिवेशनाआधी (Maharashtra Assembly Monsoon Session)  अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या मंत्र्याची  बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी ही बैठक पार पडली.  या बैठकीनंतर शरद पवार यांना भेटण्यासाठी  उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिती तटकरे, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, छगन भुजबळ वाय बी चव्हाण सेंटरला पोहचले आहेत. 


देवगिरीवर झालेल्या बैठकीला  सुनील तटकरे यांनी  मार्गदर्शन केले. बैठकीनंतर  अजित पवारांसह सर्व मंत्री वाय बी सेंटरला पोहचले. बैठकीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.  अजित पवारांसह त्यांच्या गटाने शरद पवार यांची भेट घेतली. देवगिरीवरील बैठकीनंतर अजित पवार गटाचे नेते अचानक वाय. बी. चव्हाण सेंटरवर शरद पवारांच्या भेटीला आले. यात सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, संजय बनसोडे आदींचा सहभाग होता. ही माहिती मिळताच जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडही तातडीने वाय.बी. चव्हाण सेंटरवर दाखल झाले.


शरद पवार यांनी आमच्याशी काहीच भाष्य केलं नाही


अजित पवार गटातल्या मंत्र्यांनी  आज अचानक शरद पवार यांची भेट घेतली. या नेत्यांनी एक तास शरद पवार यांच्याशी चर्चा केली. मात्र, या भेटीत शरद पवार यांनी आमच्याशी काहीच भाष्य केलं नसल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. 


आपल्या ज्येष्ठ नेत्याकडे जाण्यात वावगं काही नाही : आशिष शेलार 


अजित पवार गट आजही शरद पवारांना आपला नेता मानतात. आपल्या ज्येष्ठ नेत्याकडे जाण्यात वावगं काही नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली आहे.