बारामती: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारांच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्ताने बारामतीमध्ये शरद पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव करणारे बॅनर्स लागलेले आहेत. परंतु अनेक बॅनरचे अजित पवारांना खोचक टोला लगावणारे आहेत. बारामतीतील पंचायत समिती चौकात 'मंदिराच्या चाव्या पुजाऱ्याच्या हातात गेल्याने, विठ्ठलाचे महत्त्व कमी होत नाही' अशा आशयाचा बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तर नगर परिषदेत समोर देखील अजित पवारांना टोला लगावणारा बॅनर लावला आहे.
शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे, त्यामुळे त्यांना सर्व प्रकारे शुभेच्छा दिल्या जात आहेत. बारामती शहरात सर्वत्र शुभेच्छांचे बॅनर लागले आहेत. अनेक बॅनर वरती अजित पवारांना टोलाही लागवण्यात आले आहेत. बारामती पंचायत समिती परिसरामध्ये 'मंदिराच्या चाव्या पुजाराच्या हातात गेल्याने विठ्ठलाचे महत्त्व कमी होत नाही' अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. या एका बॅनरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे, त्याच्यावरती असलेला मजकूर सर्वात ज्या चर्चेचा विषय ठरत आहे.
'मंदिराच्या चाव्या पुजाऱ्याच्या हातात गेल्याने विठ्ठलाचे महत्त्व कमी होत नाही', हा बॅनर सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. हा बॅनर जरी शरद पवारांना शुभेच्छा देणार असला तरी यातून अजित पवारांना टोला लगावण्यात आला आहे.
अजित पवार यांनी घेतली शरद पवारांची भेट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी शरद पवारांची 85 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भेट घेतली आणि राजकीय वर्तुळात सर्वांनीच भुवया उंचावल्याचं पाहिला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह शरद पवारांची आज सकाळी दिल्लीत भेट घेतली. प्रथमदर्शनी ही वाढदिवसानिमित्त भेट घेतली अशी माहिती सांगण्यात येत असली तरी यामागे आगामी काळातील राजकीय समीकरणं असू शकतात अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोणकोणत्या नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार, सुपुत्र पार्थ आणि जय पवार, तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांनी शरद पवारांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली.
अजित पवार शरद पवार भेटीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया
शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवर बोलताना रोहित पवार म्हणाले, अजित दादा आले त्यांच्यासोबत अनेक नेते आले ही चांगली गोष्ट आहे. शेवटी हीच तर आपली संस्कृती आहे आणि ती जपली पाहिजे. ते जपणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. सर्व मोठे नेते अशा प्रकारे जर संस्कृती जपत असतील तर चांगली गोष्ट आहे. आमच्यासारख्या नवीन आमदारांना नवीन राजकारणामध्ये आलेल्यांना जेव्हा आधीची पिढी संस्कृती जपते हे बघताना आम्हाला नक्कीच आवडतात असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. राजकारणात चाललेल्या अनेक चर्चांवर बोलताना रोहित पवार म्हणाले, कधी-कधी फक्त एखादा नेता भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा इतकं म्हणून जरी बाहेर आला तरी बाहेर चर्चा सुरू होते. त्यामध्ये काही अर्थ नाही. त्यापेक्षा आपली संस्कृती जपणं हे महत्त्वाचं आहे असं रोहित पवार यांनी पुढे म्हटलं आहे.