सातारा : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची जनसन्मान रॅली आज वाई मतदारसंघात दाखल झाली. वाईत राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद पाटील हे आमदार आहेत.अजित पवार यांनी महाराष्ट्रातील महायुती सरकार शिव, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर आणि त्यांच्या कामांना आदर्श मानून काम करतोय, असं म्हटलं. महायुती सरकारच्या कामांची माहिती अजित पवार यांनी या सभेत दिली. वाई विधानसभा मतदारसंघासाठी मंजूर केलेल्या कामांची आणि निधीची माहिती देखील त्यांनी दिली. किसनवीर साखर कारखान्याला कर्जमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या. यावेळी शिट्या वाजवणाऱ्या एका उत्साही कार्यकर्त्याला अजित पवार यांनी त्यांच्या स्टाईलनं समजावलं.
महिला प्रतिसाद देतात तेव्हा आनंद वाटतो
अजित पवार यांनी आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या विचारानं काम करत असल्याचं म्हटलं. सरकारमध्ये नव्हतो त्या काळात एका वर्षात आपल्या कामांना स्थगिती देण्यात आल्याचं म्हटलं. मात्र, नंतरच्या काळात ती स्थगिती उठवण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलं. जनसन्मान योजनेच्या निमित्तानं राज्यात फिरत आहे. मायमाऊलींनी गुलाबी फेटे घातलेत मी देखील घातला आहे. मायमाऊलींना पैसे आले का विचारायचो, त्या समाधानानं आणि आनंदानं त्या प्रतिसाद देत होत्या. दादा पैसे आले असं सांगतात त्यावेळी आनंद वाटतो, असं अजित पवार म्हणाले. खूरपणीला जाणाऱ्या बहिणीकडे कुणाचं लक्ष आहे असा विचार यायचा, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवारांकडून कार्यकर्त्याची फिकी
सातारा आपलाच जिल्हा आहे, आपण एकाच परिवारातले आहोत. मधल्या काळात ज्या अडचणी निर्माण झाल्या त्यावेळी मकरंद पाटील आणि संचालक मंडळ यायचं, एकतर मी मकरंद आबांना सांगितलं होतं की खंडाळा कारखान्यात लक्ष घालू नका, असं अजित पवार म्हणाले. कारखाना निवडणूक जिंकल्यानंतर मकरंद पाटील आले आणि म्हणाले एक हजार कोटीचा बोजा आहे. एक हजार कोटीत नवा कोरा किसनीवर साखर कारखाना आणि खंडाळा साखर कारखाना तयार होईल, पैसे कुठं गेले, असा विचार केला. केंद्र सरकारमध्ये अमित शाह यांच्याकडे गेलो, ते म्हणाले प्रस्ताव पाठवा, काही ठिकाणी वन टाईम सेटलमेंट केल्या. पाचशे कोटी रुपये मंजूर करुन दिले. कारखान्याचा सत्कार संचालक बोर्डानं केला तेव्हा कान टवकारले, पाचशे कोटी कर्ज काढून दिलं अन् तुम्ही मला गणपती देता, खर्च कमी करा, तुम्ही तर तिथं भत्ता घेऊ नका पिठलं भाकरी घेऊन जावा आणि जेवा, कारखाने उभे करावे लागतात. यावर त्यांनी खर्च आमचा आम्ही केला आहे, असं सांगितल्यावर ठीक आहे, असं त्यांनी म्हटलं.
जोपर्यंत आपला कारखाना कर्जातून मुक्त होऊन खंडाळा वाईतील शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही तोवर शाल, बुके द्यायचा नाही. आपल्याकडे नारळ अधिक झालेत तो द्यायचा आणि आम्हाला पाव असं म्हणायचं. मकरंद आबा आणि तुम्ही कमी पडणार नाही, लाथ मारलं तिथं पाणी काढल, अशी धमक आपल्यात असली पाहिजे, असं अजित पवार म्हणाले. याचवेळी एकानं शिट्टी मारली तेव्हा त्याला अजित पवारांनी पोलिसांच्या ताब्यात देईन असा इशारा दिला. तु सारखी शिट्टी वाजवतो, आता पोलिसांच्या ताब्यात देईन, माझ्या माय माऊली बसल्यात त्यांच्या देखत शिट्टी वाजवणं संस्कृती नाही. तमाशाला गेलो की शिट्टी वाजवायची, मग फेटा... तेव्हा जाऊ, तुला घेऊन जातो, तुझा अपमान करायचा नाही. तुझा उत्साह निवडणुकीपर्यंत टिकला पाहिजे, म्हणून जरा दमान घे, असं अजित पवार म्हणाले.
इतर बातम्या :