Ajit Pawar : राज्य सरकारकडून शनिवारी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा पत्ता कट करण्यात आलाय. तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पुणे आणि बीडचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. तर कालपासून शिर्डी येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ‘नवसंकल्प शिबिर’ पार पडत आहे. या शिबिराला राष्ट्रवादीचे राज्यभरातून पदाधिकारी दाखल झाले आहेत. या शिबिरातून पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत रणनीती सांगितली आहे. 


अजित पवार म्हणाले की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारले, आपण सकाळी किती वाजता उठता? ते म्हणाले मी साडे तीन तास झोपतो. योगा करतो आणि शरीराला वेळ देतो. तसेच सर्व कुटुंबाची तपासणी करून घ्या, असं त्यांनी मला म्हटलं. मी देखील तुम्हाला हेच सांगतो आहे की, आपले आरोग्य तपासून घ्या, असा सल्ला त्यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिला. तर गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. आज राष्ट्रवादीच्या शिबिरात भाषण करताना धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवा. मला ठरवून टार्गेट केले जात आहे, पण मी अभिमन्यु नाही, मी अर्जुन आहे, असे त्यांनी म्हटले. यावरून अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत जे वादळ उठलं होतं ते आज थांबवण्याचं काम आपल्या भाषणातून धनंजय मुंडे यांनी केले आहे, असे म्हटले. 


अजित पवारांनी सांगितली पुढील रणनीती 


अजित पवार पुढे म्हणाले की, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने जे इच्छुक आहेत त्यांनी एक जबाबदार कार्यकर्ता निवडला पाहिजे आणि 25 घरांवर काम केल पाहिजे. म्हणजे एका घरात 4 मतं धरली तर 100 मतं मिळतील. प्रभागात प्रत्येक उमेदवाराने 50 कार्यकर्ते तयार केले तर आपण 20 हजार मतापर्यंत पोहोचू शकतो. प्रत्येकाने 100 मतांपर्यंत पोहोचायचे आहे. अधिकाधिक तरुणांना पक्षात आणायचं आहे. डॉक्टर, इंजिनिअर, वकील यांना पक्षात आणायचं आहे. राज्यातील प्रत्येक गावात, चौकात झेंडा लागेल, पक्षाचा बोर्ड लागेल याची काळजी घेतली पाहिजे. गावागावात कार्यकर्ता तयार होईल, यासाठी प्रयत्न करायला हवेत. घरातला कार्यकर्ता बाहेर पडतो, त्यावेळी तो एक पक्षात, बायको वेगळ्या पक्षात, पोरगा तिसऱ्या पक्षात आणि लेक अपक्ष आणि त्या सगळ्यांच्या विरोधात भावकी असं नको व्हायला, असे मार्गदर्शन यावेळी अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना केले. 


26 तारखेच्या आत लाडक्या बहि‍णींचे पैसे येणार 


उद्यापासून विविध विभागांना भेटून बैठका घेणार आहोत. यंदाचा अर्थसंकल्प हा आर्थिक शिस्त लावणारा असेल. 26 तारखेच्या आत लाडक्या बहि‍णींचे पैसे त्यांच्या खात्यात येतील. कधी कधी अपयश येतं परंतु ते कायमचं नसतं. विधानसभा निवडणुकीनंतर आपली जबाबदारी वाढली आहे. महायुतीला लोकसभेला केवळ 17 जागा मिळाल्या होत्या. मात्र, आता वेगळं चित्र आहे. 


मी प्रत्येक जिल्ह्यात जाणार 


विधानसभेला आपल्याला चांगलं यश मिळालं आहे. कोणतेही यश अपयश कायम नसते, आपल्याला यात सातत्य ठिकवायचं आहे. सध्या पक्षात अनेक जण येत आहेत. पक्षाची बेरीज झाली पाहिजे. मात्र, पक्षाला कमीपणा यायला नको. जनमाणसात प्रतिमा खराब असलेल्या व्यक्तीला पक्षात स्थान नको. चुकीचं काम करणाऱ्याची हकालपट्टी केली जाईल. प्रत्येक जिल्ह्यात जाण्याचा मी निर्णय घेतला आहे. एक सरकारी कार्यक्रम असेल तर एक पक्षाचा कार्यक्रम असणार आहे. मी ठरवलं आहे की, दर महिन्याला एक मंगळवारी जिल्हाध्यक्ष बैठक घेतली जाईल. सर्व जिल्हाध्यक्षांना मी बोलावणार आणि त्यांना जेवायला सुद्धा देणार, असेही अजित पवार यांनी सांगितले. 



आणखी वाचा 


Dhananjay Munde : पालकमंत्रिपद जाताच धनंजय मुंडेंचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाले, 'मी अजितदादांना सांगत होतो भाजपसोबत जाऊ नका, हे षडयंत्र...'