अहमदनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं असून आज उपोषणाचा 6 वा दिवस आहे. एकीकडे मराठा समाज मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात एकत्र आला असून अंतरवाली सराटीत देखील समाजाने गर्दी केली आहे. दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या उपोषणाला आव्हान देत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही उपोषण सुरू केलं असून त्यांच्या उपोषणाचा आज 4 था दिवस आहे. वडगोद्री येथे हाकेंनी उपोषण सुरू केल्यामुळे जालना जिल्ह्यात ओबीसी आणि मराठा समाजात (Maratha) तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. त्यातच, मराठा समाजाने जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. त्यानंतर, परभणी आणि पुणे जिल्ह्यातही मराठा समाजाने बंदची हाक दिली आहे. आता, सकल मराठा समाजाकडून अहमदनगर (Ahmednagar) जिल्हा बंदची देखील हाक देण्यात आली आहे.
सकल मराठा समाजाच्यावतीने उद्या अहमदनगर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात केलीय. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून उद्या अहमदनगर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ अहमदनगर तहसील कार्यालयासमोर गेल्या दोन दिवसापासून आमरण उपोषण देखील सुरू आहे. सगे-सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करा, हैदराबाद गॅझेट लागू करा, सातारा गॅझेट लागू करा, बॉम्बे गव्हर्मेंट गॅझेट लागू करा, मराठा बांधवांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या, अशा विविध मागण्यांसाठी हे उपोषण सुरू असून, त्याच पार्श्वभूमीवर उद्या विविध जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली असून अहमदनगर जिल्हा बंदची देखील हाक देण्यात आली आहे.
मनोज जरांगेंची तब्येत खालावली
मनोज जरांगे पाटील यांनी 20 जुलैपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं आहे. सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत त्यांनी आपलं उपोषण सुरू केलं असून आज उपोषणाचा 6 वा दिवस आहे. सोमवारी जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर निशाणा साधला होता. तसेच, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र दौरा केला, पण मराठा आरक्षणावर ते काहीही बोलले नाहीत, त्यावरुन त्यांनी शाह यांच्यावर टीका केली होती. तर, मंत्री छगन भुजबळ यांनाही इशारा देत, पुढचं उपोषण हे येवल्यात येऊन सुरू करेल, असे जरांगे यांनी म्हटले होते. आता, उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांची तब्येत खालावली असून जालन्यातील शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय पथक त्यांच्या सेवेसाठी घटनास्थळी दाखल आहे. त्यानुसार, मनोज जरांगे यांचा बीपी व शुगर कमी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
हेही वाचा
Manoj Jarange Protest: जरांगेंच्या समर्थनार्थ जालना, परभणी, पुणे बंदची हाक