Pimpri Chinchwad News : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (5 जानेवारी) भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं. यानंतर अजित पवारांनी लक्ष्मण जगताप यांच्या काही आठवणींना उजाळा दिला. लक्ष्मण जगताप हे पहिल्यांदा आमदार (BJP MLA Laxman Jagtap) कसे बनले याचा किस्सा अजित पवारांनी सांगितला. 


अजित पवार म्हणाले, "विधानपरिषदेच्या 2004 च्या निवडणुकीवेळी मी लक्ष्मण जगताप यांना सांगितलं होतं, तू अपक्ष उभा राहा. मी सांगेपर्यंत मोबाईल स्विच ऑन करु नको. वरिष्ठांचा दबाव होता. कारण त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार समोर उभे होते. तरीही मीच त्यांना उभं केलं आणि ते अपक्ष म्हणून अधिक मताधिक्याने निवडून आले" 


जगतापांच्या भावांना, मुला-मुलींना बोलावून विचारपूस


दरम्यान, अजित पवारांनी आज लक्ष्मण जगताप यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचं सांत्वन केलं. यावेळी लक्ष्मण जगतापांचे लहान भाऊ शंकर जगताप हे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंच्या बाजूला बसले होते. मात्र लक्ष्मण जगतापांचे मोठे बंधू विजय जगताप तिथं नव्हते. हे पाहून अजित पवारांनी त्यांनाही बोलावून घेतलं. मग एकामागोमाग एक घरातील सर्व मुला-मुलींना बोलावून घेतलं. ते आत्ता काय करत आहेत. शिक्षण घेत असतील तर कोणतं घेत आहेत? व्यवसायात असतील तर तो कसा करतायेत? संसारात असतील तर तो कसा सुरु आहे. याबाबत इत्यंभूत माहिती घेतली आणि वडिलकीच्या नात्याने त्यांना मोलाचा सल्ला दिला. त्यानंतर घरात जाऊन कुटुंबातील महिलांशीही त्यांनी संवाद साधला. लक्ष्मण जगताप 2014 मध्ये भाजपमध्ये गेले असले तरी त्यांचे दादांसोबत असणारा जिव्हाळा नेहमी दिसून आला. आज त्याची प्रचिती या निमित्तानेही आली.


लक्ष्मण जगताप यांचं निधन


पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचं 3 जानेवारी रोजी निधन झालं. लक्ष्मण जगताप हे दीर्घ काळापासून आजारी होते. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लक्ष्मण जगताप यांना कर्करोगाने ग्रासलं होतं. त्यांच्यावर नियमित उपचार सुरु होते. मात्र त्यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. लक्ष्मण जगताप हे तीन टर्म पिंपरी-चिंचवडचे आमदार होते. 


राज्यसभेच्या मतदानासाठी अॅम्ब्युलन्समधून मुंबईत 


दरम्यान, लक्ष्मण जगताप यांची पक्षनिष्ठा ही राज्यसभा निवडणुकीवेळी दिसून आली होती. रुग्णालयात असूनही त्यांनी 10 जून 2022 रोजी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी अॅम्ब्युलन्सने मुंबईत येऊन मतदान केलं होतं. अत्यंत अटीतटीच्या लढतीसाठी लक्ष्मण जगताप यांनी आपलं बहुमूल्य मत दिलं होतं. त्यामुळे भाजपने आपली तिसरी जागाही निवडून आणली होती.


VIDEO : Ajit Pawar On Laxman Jagtap:मोबाईल बंद ठेवला आणि लक्ष्मण जगताप आमदार झाले, दादांनी किस्सा सांगितला


संबंधित बातमी


Laxman Jagtap Passed Away : पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन; कर्करोगाशी झुंज अखेर अपयशी