मुंबई : बीड जिल्हा गेल्या महिनाभरापासून गु्न्हेगारी आणि गुंडगिरी व दहशतीच्या वृत्तांनी समोर आलाय. त्यातच, बीड (Beed) जिल्ह्यातील परळी मतदारसंघात खंडणी, गुन्हेगारी,बंदुकधारी आणि गुत्तेदारीसारख्या घटना दैनंदिन असल्याचा आरोप विरोधी आमदारांकडून केला जात आहे. त्यामुळे, बीडचा बिहार झालाय का असे म्हणत बीड जिल्ह्याच नाव राज्यात झाकोळल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्याकांडानंतर अनेक जिल्ह्यातील नागरिक आम्हाला आमच्या जिल्ह्याचा बीड करायचा नाही, असंही म्हणतात. मात्र, बीडमधील काही उदाहरणांनी बीडचं नाव जगात सुवर्णअक्षरांनी कोरलंय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामध्ये, टॉरल इंडिया या जागतिक कंपनीचे एम.डी. भरत गिते. टॉरल इंडिया ही पुण्यात (pune) स्थित एक जागतिक दर्जाची अत्याधुनिक अल्युमिनियम फाउंड्री आहे, जी विविध उद्योगांना अत्याधुनिक अॅल्युमिनियम कास्टिंग सोल्यूशन्स उपलब्ध करून देण्याचं काम करते. नुकतेच या कंपनीने दावोसमध्ये राज्य सरकारसोबत 500 कोटी रुपयांचा करार केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी झाल्या.
स्वीत्झरलँड येथील दावोस येथे बीड जिल्ह्याच्या परळीचे मुळचे रहिवासी असलेले सध्या जर्मनी व पुणे येथे कार्यरत असलेले टॉरल इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत गिते यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत टौरल दरम्यान मोठ्या गुंतवणुकीच्या करारावर स्वाक्षरी केली. महाराष्ट्र सरकार आणि टौरल इंडियामध्ये एकूण 500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार झाला त्यातून 1200 जणांना रोजगार मिळू शकेल. टौरल इंडिया लिमिटेड ही स्टील आणि धातू क्षेत्रात काम करणारी जर्मन कंपनी आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत टौरल इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत गिते यांचे आभार मानले. त्यामुळे, गेल्या महिनाभरापासून बदनाम झालेल्या बीडमधील परळीचं नाव चांगल्या कारणाने पुढे आलंय. भरत गिते यांनी आपल्या उत्कृष्ट उद्योजकीय कार्यातून बीडचं नाव उद्योग क्षेत्रात झळवलंय, असेच म्हणावे लागेल.
काय म्हणाले भरत गिते
टॉरल इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भरत गिते या उपक्रमाबद्दल बोलताना म्हणाले, “महाराष्ट्रातील एका छोट्या शहरातून आल्यामुळे, मी नेहमीच टियर II भागांतील प्रचंड क्षमतेवर विश्वास ठेवला आहे आणि त्यांच्या प्रगतीसाठी संधी शोधण्याचा निर्धार केला आहे. 2020 मध्ये मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो तेव्हा त्यांच्याशी या दृष्टिकोनाबद्दल चर्चा करण्याचे भाग्य मला मिळाले आणि आज त्यांच्याच दूरदृष्टीमुळे हे स्वप्न साकार होत असल्याचे पाहून मला अभिमान वाटतो, असे गिते यांनी म्हटलं. या भागात जागतिक दर्जाचे कौशल्य आणि तंत्रज्ञान विकसित करून, जागतिक दर्जाची पायाभूत संस्कृती प्रस्थापित करण्याचा आम्हाला विश्वास आहे. स्थानिक क्षेत्रामध्ये जागतिक कौशल्य आणि नवकल्पनांचे संयोजन करून, सुपाला उत्पादनाचे केंद्र म्हणून विकसित करण्याचे आमचे ध्येय आहे आणि या भागाच्या विकासासाठी नवीन मानके स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहोत.”, असेही गिते यांनी या करारावेळी म्हटलं.
सुपा गावात 1200 हून अधिक रोजगार
दरम्यान, महाराष्ट्रातील अहिल्या नगरमधील सुपा येथे उत्पादन कार्याचा विस्तार करण्यासाठी टॉरल इंडियाने दावोसमध्ये महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. या विस्तारामुळे उत्पादनामध्ये वाढ होणार असून या भागात 1200 हून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील. हा सामंजस्य करार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2025 मध्ये करण्यात आला.
सरकारसोबत ऐतिहासिक करार
जागतिक स्तरावरील अग्रगण्य इंटिग्रेटेड अल्युमिनियम फाउंड्री असलेल्या टॉरल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने सुपा (अहिल्या नगर, महाराष्ट्र) येथील 12,00,000 चौरस फूट उत्पादन सुविधेचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत एक ऐतिहासिक सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. हा सामंजस्य करार वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमदरम्यान दावोस येथील महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये झाला, ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस, उदय सामंत आणि अन्य वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते. या सुविधेमुळे 1200 हून अधिक स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, या भागातील समुदायाच्या प्रगतीसाठी एक परिवर्तनकारी पाऊल उचलले गेले आहे.
टॉरल इंडिया जागतिक दर्जाची अत्याधुनिक अल्युमिनियम फाउंड्री
टॉरल इंडिया ही पुण्यात स्थित एक जागतिक दर्जाची अत्याधुनिक अल्युमिनियम फाउंड्री आहे, जी विविध उद्योगांना अत्याधुनिक अॅल्युमिनियम कास्टिंग सोल्यूशन्स उपलब्ध करून देण्यासाठी आणि 750 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना रोजगार देण्यासाठी वचनबद्ध आहे. कंपनीने "मेक इन इंडिया" उपक्रमाला पाठिंबा देत भारताला स्वयंपूर्ण बनवण्याचा निर्धार केला आहे. कंपनी रेल्वे, संरक्षण, सागरी, एरोस्पेस, ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा आणि इलेक्ट्रिक वाहने यांसारख्या विविध क्षेत्रांसाठी उपयुक्त घटक तयार करून देशाच्या औद्योगिक विकासात योगदान देत आहे.
पुण्यातही कंपनीचे प्रकल्प
सुपा हे एक धोरणात्मक स्थान असून, प्रमुख बाजारपेठांच्या जवळ असल्यामुळे प्रगत उत्पादनाचे एक केंद्रबिंदू म्हणून ओळखले जाते. टॉरल इंडियाने या भागात विस्तार करण्याचा घेतलेला निर्णय अहिल्या नगरच्या ऊर्जा, संरक्षण, एरोस्पेस, रेल्वे, सागरी, आरोग्यसेवा आणि इतर उच्च-विकास क्षेत्रांमध्ये भारताला पाठिंबा देण्याच्या क्षमतेवरील विश्वास दर्शवतो. टॉरल इंडियाकडे अॅल्युमिनियम सॅंड-कास्टिंग सोल्यूशन्समध्ये उत्पादन डिझाइनपासून ते गुणवत्तेची चाचणी, पेंटिंग, उत्पादन बांधणी, असेंब्ली आणि वितरणापर्यंत एकाच ठिकाणी सेवा पुरविण्याचा सिद्ध ट्रॅक रेकॉर्ड आहे. पुण्यातील त्यांच्या प्रमुख सुविधेद्वारे त्यांनी अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सेवा पुरवल्या आहेत. तसेच, जागतिक दर्जाच्या उपाययोजना देऊन पुणे शहराला जागतिक नकाशावर स्थान मिळवून दिले आहे. सुपा प्रकल्पाचा विस्तार अहिल्या नगरला औद्योगिक केंद्र बनवण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या ध्येयाला मोठे योगदान देईल. या भागात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करून, टॉरल इंडिया महाराष्ट्र सरकारला उत्पादन परिसंस्था मजबूत करण्यासाठी, रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी, कौशल्यविकासाला चालना देण्यासाठी, प्रादेशिक आर्थिक विकासात योगदान देण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणावर कमी करण्यासाठी पाठिंबा देत आहे. जर्मनी आणि पोलंडमधील अॅल्युमिनियम कास्टिंग तंत्रज्ञानात आघाडीवर असलेल्या जगप्रसिद्ध थोनी अल्युटेक ग्रुपसोबत संयुक्त उपक्रम म्हणून स्थापित, टॉरल इंडियाने भारतात तांत्रिक कौशल्य आणि क्षमता धोरणात्मक पद्धतीने विकसित केल्या आहेत. पुण्यातील 3,00,000 चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या सध्याच्या प्रकल्पासह, ही कंपनी विविध क्षेत्रांतील आघाडीच्या ब्रँड्ससाठी विश्वासू भागीदार बनली आहे. यामध्ये ऑर्डनन्स फॅक्टरी (संरक्षण), भारतीय रेल्वे, एबीबी, जनरल इलेक्ट्रिक, सिमेन्स आणि ह्योसंग यांसारख्या प्रतिष्ठित क्लायंटचा समावेश आहे. टॉरल इंडियाचा हा विस्तार भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या त्याच्या दृष्टीकोनाला अधिक बळकट करत आहे आणि अहिल्या नगरला महाराष्ट्राच्या औद्योगिक भविष्यातील एक महत्त्वाचा उत्पादक बनवण्यासाठी सक्षम करत आहे.
हेही वाचा
वाल्मिक कराडचे लातुरातही घबाड, दुसऱ्या पत्नीच्या नावे कोट्यवधींची जमीन