पुणे - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच महायुती आणि महाविकास आघाडीत सामना होत आहे. २०१९ पासून राज्यातलं राजकारण नागमोडी वळणं घेत असल्याने कोण कोणाचा मित्र, आणि कोण कोणाचा शत्रू हेच कळायला मार्ग नाही. त्यामुळे, राजकीय विरोधक हे सोबती झाले तर, सोबती हे विरोधकाच्या भूमिकेत आमने-सामने आले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपावरुनही चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली. त्यामध्ये, शिरुरची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला तर मावळची जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळाली आहे. मावळमधून खासदार श्रीरंग बारणे तिसऱ्यांदा लोकसभेच्या मैदानात आहेत. गतवर्षी त्यांनी अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा पराभव केला होता. मात्र, यंदा तेच पार्थ पवार श्रीरंग बारणेंच्या प्रचारासाठी उतरणार असल्याचे दिसून येते. कारण, उमेदवारी अर्ज दाखल करताना आपण पार्थ पवार यांनाही निमंत्रण देणार असल्याचे बारणे यांनी म्हटलं आहे. तर, महायुतीचे दिग्गज नेते येणार असल्याने अजित पवार हेही उपस्थित राहतील का, असाही प्रश्न अनेकांना पडला आहे.
पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे. मावळ मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून श्रीरंग बारणे २२ एप्रिल रोजी दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार आहेत. श्रीरंग बारणे यांनी दोनवेळा या मतदारसंघातून विजय मिळवला असून यंदा विजयाची हॅट्टीक करण्याचा त्यांचा निर्धार आहे. त्यामुळेच, महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ते अर्ज दाखल करउन असून गत निवडणुकीतील त्यांचे प्रतिस्पर्धी पार्थ पवार यांनाही त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निमंत्रण देणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे, ज्यांच्याकडून पराभव झाला त्यांच्याच प्रचारासाठी पार्थ पवार येणार असल्याची चर्चा मावळ मतदारसंघात आहे. तर, महायुतीच्या प्रमुख नेत्यांपैकी राष्ट्रवादीकडून अजित पवार येतील की सुनिल तटकरे याबाबत साऱ्यांनाच उत्सुकता लागली आहे. मात्र, पार्थ पवार यांची उपस्थिती लक्षणीय ठरणार असून पार्थ पवार येतील की नाही हे २२ मार्च रोजीच समजणार आहे.
दरम्यान, गत लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांना तब्बल २ लाख १५ हजार ९१३ मतांनी पराभव पत्कारावा लागला होता. त्यामुळे, अजित पवार आणि पवार घराण्याची प्रतिष्ठा लागलेल्या या मतदारसंघात श्रीरंग बारणेंनी आपली पत कायम राखली होती. आता, त्याच श्रीरंग बारणेंच्या प्रचारासाठी पार्थ पवार आणि अजित पवार उपस्थित राहणार असल्याने मतदारसंघात चांगलीच चर्चा रंगली आहे. राजकारण कोणत्या वळणावर जाईल हे कधीच सांगता येत नाही, त्यातीलच हे आणखी एक उदाहरण असंच म्हणता येईल.
सामना शिवसेना विरुद्ध शिवसेना
मावळ मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी प्रचाराला काही महिन्यांपासून जोमाने सुरुवात केली आहे. गतवेळेस उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं हा गड जिंकला होता. मात्र, पक्षात फूट पडल्यानंतर आता नवा गडी उद्धव ठाकरेंनी मावळच्या रणांगणात उतरवला आहे. त्यामुळे, शिवसेना विरुद्ध शिवसेना यांच्यातील सामन्यात धनुष्यबाण बाजी मारणार की विजयाची मशाल पेटणार हे पाहावे लागेल.
निवडणूक म्हटलं की घोषणांचा पाऊस आणि नेतेमंडळींना मोठ-मोठी विशेषणं लावण्याची स्पर्धा सुरू असते. प्रचारासाठी नव-नव्या घोषणा, घोषवाक्यही पाहायला मिळतात. भाजपाने केंद्रात सरकार स्थापन करण्याच्या उद्देशाने यंदा'अब की बार चार सौ पार' आणि 'फिर एक बार मोदी सरकार' ही घोषणा दिली आहे. तसेच, मोदी की गँरंटी या घोषणेवरही भर आहे. त्याचप्रमाणे मावळ मतदारसंघात 'तिसरी बार, बारणे खासदार' ही घोषणा यावेळी देण्यात येत आहे. समन्वयाच्या धोरणामुळे युद्धामध्ये व निवडणुकांमध्ये हे यश मिळते, हा इतिहास आहे. त्यामुळे, महायुतीतील घटक पक्षांमध्ये शेवटपर्यंत समन्वय राहणे आवश्यक आहे, असे बारणेंनी यापूर्वीच म्हटले आहे. त्यामुळे, त्यांच्या उमेदवारी अर्जासाठी समन्वय साधत कोण-कोण बडे नेते उपस्थित राहतील हे पाहावे लागेल.