Shrirang Barne vs Sanjog Waghere : मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीरंग बारणे (Shrirang Barne) विरुद्ध संजोग वाघेरे (Sanjyog Waghere) अशीच लढत आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना होणार आहे. महायुतीचे मावळ मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार मावळमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी खणखणीत भाषण केले. शिवाय आपले जुने सहकारी संजोय वाघेरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. संजोग वाघेरे  हे एकेकाळी अजित पवारांचे निकटवर्तीय होते. पण आता ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत, तर अजित पवार भाजपसोबत महायुतीमध्ये आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी बारणेंच्या प्रचारावेळी संजोग वाघेरे यांच्यावर निशाणा साधला. विरोधी उमेदवार (संजोग वाघेरे) कदाचित असं सांगेल की अजित दादांनी मला उभं राहायला सांगितलं आहे, पण तसं नाही, असे अजित पवार म्हणाले. 


मावळ लोकसभा उमेदवार संजोग वाघेरे अजित पवारांचे निकटवर्तीय होते. मात्र, त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. 2019 मध्येही वाघेरे यांना लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा होती. मात्र, पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आल्याने त्यांनी माघार घेतली. आता ते महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यापुढे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचं आव्हान आहे. आज अजित पवार बारणेंच्या प्रचारासाठी आले होते, त्यावेळी त्यांनी अनेक विषयावर भाष्य केले. 


भूलथापांना बळी पडू नका - अजित पवार


विरोधी उमेदवार (संजोग वाघेरे) कदाचित असं सांगेल की अजित दादांनी मला उभं राहायला सांगितलं आहे. असं अजिबात नाही, अख्खा महाराष्ट्र जाणतो मी असलं काही करत नाही. आपला उमेदवार हा श्रीरंग बारणे आहे, धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबा, भूलथापांना बळी पडू नका, असे अजित पवार म्हणाले. 



पार्थचा पराभव करणाऱ्या श्रीरंग बारणेंसाठी अजित पवार मैदानात उतरले 


पवार कुटुंबीयांचा पहिला पराभव पार्थच्या रुपाने मावळ लोकसभेत झाला होता. श्रीरंग बारणेंनी 2019 साली हा पार्थ पवार यांना अस्मान दाखवलं होतं. हा पराभव अजित पवारांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. मात्र अलीकडेच समीकरणं बदलली आहेत. त्यामुळंच अजित पवार मुलाचा पराभव पचवून थेट बारणेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. आज मावळ लोकसभेत महायुतीच्या समन्वय बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. यासाठी स्वतः अजित पवार उपस्थित राहिले. 


मतदारसंघातील आमदारांचं बलाबल काय ?
 
पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा हा मावळ लोकसभा मतदारसंघ आहे. पिंपरी, चिंचवड आणि मावळ हे पुण्यातले तर कर्जत, उरण आणि पनवेल हे रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा यात समावेश आहे. यात चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, पनवेलमध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर, उरणमध्ये अपक्ष निवडून आलेले मात्र भाजप संलग्न असणारे महेश बालदी तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पिंपरीत अण्णा बनसोडे, मावळमध्ये सुनील शेळके आणि कर्जतमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे महेंद्र थोरवे हे विधानसभेचे नेतृत्व करतात. भाजपचे तीन, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि शिंदेंच्या शिवसेनेचा एक असं आमदारांचं पक्षीय बलाबल आहे.