Ajit Pawar News : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची (Sharad Pawar) खेळी होती, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एबीपी माझाशी बोलताना केला होता. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. "त्यावेळी मी स्वत: म्हटलेलं होतं की तो विषय मी कदापि काढणार नाही," असं म्हणत अजित पवारांनी यावर कोणतंही भाष्य करण्यास नकार दिला. तसंच आपण उपमुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याची कोणतीही चर्चा झाली नाही, असंही त्यांनी स्पष्ट सांगितलं. ते जालन्यात बोलत होते.  


जयंत पाटील काय म्हणाले होते?


23 नोव्हेंबर 2019 रोजी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी झाला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या भाष्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. जयंत पाटील म्हणाले की, "मला वाटत नाही की अजित पवार भुलले असतील. त्यावेळी राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठवण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. त्या अनुषंगाने खेळलेली एखादी खेळी असू शकते."


पहाटेच्या शपथविधीबाबत अजित पवार म्हणतात... 


याच विषयी अजित पवार यांना विचारलं असता त्यांनी त्यावर भाष्य करण्याचं टाळलं. "पहाटेच्या शपथविधीचा विषय मी कदापिही काढणार नाही," असं अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितलं.


फडणवीस यांना अडकवण्याची कोणतीही चर्चा झाली नाही : अजित पवार


दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला जेलमध्ये टाकण्यासाठी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना टार्गेट देण्यात आल्याचा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझा माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्याक्रमात केला होता. यावरुन वातावरण तापलं होतं. त्यातच फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मास्टरमाईंडचं नाव जाहीर करणार असल्याचं भाजप नेते आशिष शेलार म्हणाले होते. यावर अजित पवार म्हणाले की, कोड्यात बोलू नये, स्पष्ट सांगावं." "कोण काय म्हणालं याला उत्तर द्यायला आम्ही मोकळे नाहीत. प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे, मतस्वातंत्र आहे, ज्यांना जे काही सांगायंच आहे त्यांनी सांगावं. असं कोड्यात बोलू नये, स्पष्ट भूमिका मांडली तर लोकांना जास्त चांगल्याप्रकारे कळेल. मी याआधीच सांगितलं आहे की, अडीच वर्षे उपमुख्यमंत्री असताना ज्या ज्या चर्चा झाल्या किंवा मी काही निर्णय घेतले त्यात अशाप्रकारची कुठलीही चर्चा आपल्या स्तरावर झाली नाही," असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.


संबंधित बातमी


Jayant Patil On Sharad Pawar : पहाटेचा शपथविधी ही पवारांची खेळी, जयंत पाटील यांचं वक्तव्य