Jayant Patil On Sharad Pawar : 23 नोव्हेंबर 2019 रोजी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी झाला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी फार मोठं वक्तव्य केलं आहे. "देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा पहाटेचा शपथविधी ही पवारांची (Sharad Pawar) खेळी असू शकते," असं जयंत पाटील म्हणाले आहेत. आता त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण जोरदार तापणार आहे. एबीपी माझाशी बोलताना जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केलं.
'राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी शपथविधीची खेळी'
जयंत पाटील म्हणाले की, "मला वाटत नाही की अजित पवार भुलले असतील. त्यावेळी राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठवण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. त्या अनुषंगाने खेळलेली एखादी खेळी असू शकते. त्यामुळे अजित पवारांनी त्यावेळी जी वक्तव्ये केली त्याला फार महत्त्व आहे, असं मला वाटत नाही. त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री बनून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात काम केलं. स्पष्टपणे कारभार केला. राष्ट्रवादी फुटली नाही. शिवसेनेचेच आमदार आमदार गेले म्हणून सरकार कोसळलं. राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंना शेवटपर्यंत ठामपणे साथ दिली हे आपल्याला नाकारता येणार नाही."
पहाटेचा शपथविधी आणि राज्यात खळबळ
23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. पहाटेच्या शपथविधीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. 2019 साली महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या संघर्षाच्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा दावा करत भल्या पहाटे राजभवानावर जाऊन शपथ घेतली होती. परंतु अल्पवधीतच सरकार कोसळलं. आजही फडणवीस यांच्या मनात ही सल कायम आहे. जाहीर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी करुन चूक केल्याचं बोलून दाखवलं होतं.
Jayant Patil on Sharad Pawar : पहाटेचा शपथविधी ही पवारांची खेळी, जयंत पाटील यांचा मोठं वक्तव्य
प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुरबुरी
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या एका वक्तव्याने महाविकास आघाडीमध्ये कुरबुरी सुरु झाल्या आहेत. एबीपी माझाशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्याबाबत धाडसी वक्तव्य केलं आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली. खरंतर प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे अडचणीत आले आहेत. शरद पवार हे भाजपचेच आहेत, असं धाडसी वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी एबीपी माझाशी बोलताना केलं होतं. त्याच्या या वक्तव्यावंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून आता उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. राष्ट्रवादी आक्रमक झाल्यानंतर ठाकरे गटाने आस्ते कदम भूमिका घेत संजय राऊत याबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं.