Aurangabad News: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) 73 व्या वर्धापन दिनानिमित्त औरंगाबादच्या एमआयएमच्या पक्ष कार्यालयात करण्यात आलेल्या ध्वजारोहणाला (Flag Hoisting) अनेक माजी नगरसेवक आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. तर अशा लोकांची पक्षात गरज नसून, त्यांना यापुढे महत्वाचे पद देऊ नका अशा सूचना त्यांनी यावेळी जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांना दिल्या. तर उद्या उमेदवारी देण्याचं निर्णय माझ्याचं हातात असणार असल्याचं देखील जलील यावेळी म्हणाले.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त अनेक ठिकाणी आज ध्वजारोहण करण्यात आले. दरम्यान औरंगाबादच्या एमआयएमच्या पक्ष कार्यालयात देखील जलील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र यावेळी कार्यक्रमात अनेक माजी नगरसेवक आणि पक्षाचे महत्वाचे पदाधिकारी उपस्थित नसल्याचे पाहून जलील यांनी आपल्या भाषणातून त्यांचा चांगलाच समाचार घेतला. तर आज घरात झोपेलेल्या पदाधिकारी यांना निवडणुकीत उमेदवारी देताना मी काही झोपेत उमेदवारी देणार नसल्याचं म्हणत त्यांनी थेट इशाराच यावेळी दिला.
काय म्हणाले जलील!
काल न्यायालयात एका आंदोलनाप्रकरणी सुनावणी असल्याने आरोप असलेले सर्वच पदाधिकारी वेळेत न्यायालयात पोहचले होते. मात्र आज पक्ष कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम असताना घरात झोपले आहे. बहुतेक यांच्यावर जास्त कामाचा बोजा पडत आहे. कोणाला वाटत असेल की माझं काहीच होणार नाही, पक्षात माझं नेहमीच वर्चस्व राहील, माझं कोण कोण काय करणार असे वाटत असेल तर, लक्षात ठेवा देण्याचा अधिकार देखील माझ्याकडे होता आणि काढून घेण्याचा देखील, असा इशारा जलील यांनी यावेळी दिला.
अन्यथा बाहेरचा रस्ता दाखवा...
तर आजच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात जेवढे माजी नगरसेवक गैरहजर आहेत, त्यांनी लक्षात ठेवावे की उमेदवारी देताना मी झोपणार नसून जागा राहणार आहे. तसेच अशा लोकांना पक्षात ठेवण्याची काहीही गरज नाही. त्यांना यापुढे कोणतेही महत्वाचे पद देण्याची देखील गरज नसल्याचं जलील म्हणाले. जे पक्षासाठी काम करत असतील त्यांना ठेवा अन्यथा बाकीच्यांना बाहेरचा रस्ता दाखवा असे जलील म्हणाले. मी सहज खासदार बनलो नाही, माझं सर्वांकडे लक्ष असते. कोण काय करते यावर माझे लक्ष आहे, असेही जलील म्हणाले आहे. तसेच एमआयएम पक्षात काम करणाऱ्यांची कमतरता नाही असेही जलील म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: